स्वकीर्ति बुभुक्षित, स्वस्तुती अभिलाषी, स्वनामधन्य होत्सात्या अशा ह्या मंडळींचे आपल्या अभासी स्वनिर्मित दु:खावर इतके प्रेम असते, की स्वत:च्या सत्कार सोहळ्यातही हे कधी तोंडभरून दिलखुलास हसत नाहीत की ‘ह्या सत्कार सोहळ्याने मी भरून पावलो आहे’ अशी कृतज्ञतेची भावना व्यक्त करत नाहीत. उत्तरादाखलच्या भाषणात यांचं पहिलं वाक्य असतं, ‘खूप उशिरा का होईना तुम्हाला माझी दखल घ्यावीशी वाटली, ह्याबद्दल तुम्ही कौतुकास पात्र आहात.’ म्हणजे ह्यांचे हे असे...स्वक र्तृत्वाचे कथनसुद्धा हुंदकेवजा असते,सत्काराचे उत्तरसुद्धा फिर्यादवजा असते.चीज झाले नाही, म्हणत सतत कुढतात,स्वत:च्या प्रेतावरती जणू स्वत:च रडतात.भरून निघणार नसते त्यांच्या तृप्तीची उणीवकारण त्यांचे वैफल्य असते सदैव चिरंजीव.असे असले तरी स्वत:ला ‘ओवाळून’ घेण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. स्वत:च्या खर्चाने स्वत:चे सत्कार सोहळे साजरे करून घेण्यात अशी मंडळी तरबेज असते. कोनाड्यात दिवा ठेवून आपणच आपली मान दिव्याभोवती गरगरा फिरवून घेण्यासारखा हा प्रकार असतो. परत, लाजत लाजत ‘‘काय करणार, स्रेहीजनांचा फार आग्रह होता, नाही तरी किती वेळा म्हणायचं हो! हे असले प्रकार मला अजिबात आवडत नाहीत. पण शेवटी स्रेह्यांच्या प्रेमापुढे झुकावेच लागते.’ खरी गोष्ट अशी असते की सत्कार सोहळ्याच्या सगळ्या बैठका ह्यांच्याच घरात झालेल्या असतात. कोणत्या थोरपुरुषाच्या हस्ते सत्कार करून घेणे आवडेल, तेही हेच सांगणार. स्मृतीचिन्ह कसे असावे, थैलीत किती रक्कम गोळा व्हायला हवी, याचे धोरणही हेच ठरवणार, दिसला माईक की धावत सुटणारा, थांबा, थांबा, म्हटलं तरी बोलत सुटणारा, समोर दिसेल त्याची अफाट स्तुती करून ‘राईचा पर्वत करणे’ म्हणजे काय ह्याचा जो वस्तूपाठ आहे, असा पगारी सूत्रसंचालकाच्या हाती स्वस्तुतीचे सूत्रही हेच सोपवणार आणि तरीही सत्काराला उत्तर देताना, ‘‘असला गौरव स्वीकारण्याएवढा मी मोठा नाही. ह्या वेळी मी तुमच्या भिडेला बळी पडलो, पण पुन्हा अशा धर्मसंकटात मला टाकू नका, अशी सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती करतो,’ असं म्हणत टाळ्याही वसूल करणार. सारा मामला ‘अगं, अगं, म्हशी, मला कुठे नेशी’ कथेतल्यासारखा.रात्री हिरमुसल्या चेहऱ्याने पत्नीला म्हणणार, ‘सांस्कृतिक मंत्र्यांच्या हस्ते सत्कार. ह्याला काय सत्कार म्हणायचा? मुख्यमंत्र्यांना आणायचं आश्वासन दिलं होतं मला. छे, ह्या जन्मात माझ्या कार्याचं चिज होईल असं नाही मला वाटतं’ आणि गाढ झोपेतल्या घोरणाºया पत्नीकडे बघत स्वत:वर चरफडत मनातल्या मनात म्हणणार, ‘घरचे काय आणि दारचे, सगळे सारखेच. कोणालाच कौतुक नाही.’ (उत्तरार्ध)- प्रा.अनिल सोनार
अगं, अगं, म्हशी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 1:17 PM