शहरात संसर्गाचा विस्फोट : ग्रामीणमध्ये ५४ रुग्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात एकाच दिवसातील कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाला. उच्चांकी ४३० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यासह ग्रामीणमध्येही संसर्ग वाढला असून ५४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. शहराची वाटचाल वीस हजारांच्या दिशेने सुरू असून शहराची रुग्णसंख्या १९३९० नोंदविण्यात आली आहे.
शहरात गेल्या आठवडाभरातच मोठ्या प्रमाणावर रुग्ण समोर आले आहेत. नियमित तीनशे साडेतीनशे येणाऱ्या रुग्णसंख्येने सोमवारी उसळी घेत थेट ४३० रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील कोरोना संसर्ग थांबत नसून तो प्रचंड प्रमाणात वाढत असल्याचे गंभीर चित्र कायम आहे. सोमवारी १२०२ आरटीपीसीआर अहवालांमध्ये ३९१ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. तर ४८७३ ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ६०१ रुग्ण समोर आले आहेत. अहवालांमधील बाधितांचे प्रमाण वाढत असल्यानेही चिंता व्यक्त केली जात आहे. सोमवारी जळगावातील ६२ व ८७ वर्षीय पुरुष, चोपडा तालुक्यातील ६८ व ७५ वर्षीय महिला, धरणगाव तालुक्यातील ६२ वर्षीय पुरुषाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रुग्णसंख्या वाढत असताना बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी ७१६ रुग्णांना बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला.
सक्रिय रुग्ण : ७८५२
लक्षणे नसलेले : ६१६७
लक्षणे असलेले : १६८५
होम आयसोलेशमध्ये ५०९५