जळगाव : मुंबई येथून सुप्रीम पाईप कंपनीचे लाखो रुपयांचे पावडर घेऊन आलेल्या कंटनेरची ऑईल गळती झाल्याने आग लागली व त्यात केबिन जळून खाक झाली. अग्निशमन बंब वेळेत दाखल झाल्याने आग तर विझवली, परंतु मोठी हानी त्यामुळे टळली. दरम्यान, कंटेनरमधील लाखो रुपयांची पावडर सुरक्षित राहिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास अजिंठा चौकानजीक घडली.श्री यश रोड लाईनचे (क्र.एम.एच.४६ एफ ८५०७) क्रमांकाचे कंटेनर मुंबई येथील लावाशिवा बंदर येथून सुप्रीम पाईप कंपनीचे लाखो रुपये किमतीचे पावडर घेवून सोमवारी गावात पोहचले. अजिंठा चौफुलीजवळ असलेल्या जळगाव पिपल्स बँकेच्या समोर चालकाने कंटेनर थांबविले. पाहणी केली असती, कॅबिनच्या खालच्या बाजूने ऑईलची गळती होत होती. याबाबत चालक गोविंद पाल याने श्री यश रोड लाईनचे मालक किशोर मेश्राम यांना कळविले. यानंतर चालक प्रसाधन करण्यासाठी निघून गेला. तेथून परतला आला असता कॅबिनमधून धूर निघत होता, काही वेळात त्याचे आगीत रुपांतर झाले. माहिती मिळाल्यानुसार मेश्राम यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले.अग्निशमन कार्यालयाला फोनवरुन घटना कळविली. त्यानुसार महापालिकेचा अग्निशमन बंब तत्काळ पोहोचला. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, योगेश बारी व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी पाण्याचा मारा करत आग विझविली. या आगीत कंटेनरची कॅबीने पूर्णपणे खाक झाली आहे.
ऑईल गळतीने कंटेनरने घेतला पेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2020 8:41 PM