जळगाव : पंप हाऊसवरील बॅरेलमधील आॅईल टाकीत गेल्यामुळे रविवारी महाबळ परिसरात चक्क तेलकट पाणी पुरवठा झाल्याचा प्रकार घडला. महिनाभरापासून आधीच दुषीत पाणी येत असतांना, रविवारी अतिशय तेलकट पाणी आल्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करून मनपा आधिकारी व महापौरांकडे तक्रार केली आहे.गेल्या आठवड्यात महाबळ परिसरात दूषित पाणी पुरवठा झाल्याने नगरसेवक नितीन बरडे यांनी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार करून हा प्रकार निदर्शनास आणून दिला होता. त्यानंतर रविवारी पुन्हा या ठिकाणी दूषित आणि आॅईल युक्त पाणी पुरवठा झाला. या पाण्याचा वासही येत असल्यामुळे नागरिकांनी कुठल्याही प्रकारचा पाणी साठा केला नाही.ऐन पावसाळ्यात अशा प्रकारचा दूषित पाणी पुरवठा झाल्यामुळे नागरिकांनी मनपा प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला.या संदर्भात ‘लोकमत’ ने मनपाच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी गिरणा टाकीवरील पंप हाऊसवर आॅईलचे बॅरेल ठेवण्यात आले होते. मात्र, टाकीतील पाणी वर उडाल्याने पंप हाऊसवरील आॅईलच्या बॅरेलवरील तेलकट भागावर पडून, हे पाणी पुन्हा टाकीमध्ये गेले. त्यामुळे टाकीतील पाणी तेलकट झाले होते. पाणी पुरवठा सुरू केल्यावर नागरिकांकडून हा प्रकार समजल्यानंतर तात्काळ पाणी पुरवठा बंद करून टाकी साफ केली. त्यानंतर सायंकाळी पुन्हा या भागात नव्याने पाणी पुरवठा सोडण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.तांत्रिक कारणामुळे महाबळ परिसरात तेलकट पाणी पुरवठा झाला. हा प्रकार समजल्यानंतर तेलकट पाण्याची समस्या तात्काळ दूर केली. सायंकाळी पुन्हा या ठिकाणी नव्याने पाणी पुरवठा करण्यात आला.-सुशील साळुंखे, विभाग प्रमुख, पाणी पुरवठा विभाग, मनपा.
महाबळ परिसरात आॅईलयुक्त पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 12:20 PM