लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून उन्हाळा, कडक निर्बंध, आठवडी बाजार बंद, भाजी बाजारात देखील एक दिवसाआड विक्रेते अशा नियमांमुळे भाजी बाजारातील काही भाज्यांचे दर वाढले आहेत तर काही दर स्थिर राहिले आहेत. भेंडी, गवार, चवळी आणि मेथी महागली आहे.
जळगाव जिल्ह्यात आठवडी बाजार बंद आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी जे जळगावला आठवडी बाजारात भाजी विक्रीसाठी येत होते. ते आता दररोज भाजी विक्री करणाऱ्यां विक्रेत्यांना किंवा कृऊबात माल घेऊन जात आहेत. त्यामुळे भाजीची आवक देखील काही प्रमाणात वाढली आहे. मात्र भेंडी, गवार, चवळी आणि पालेभाजी प्रकारात मेथी यांचे दर मात्र चांगलेच वाढले आहेत.
दोन आठवडे आधी ४० रुपये किलोने मिळणारी भेंडी आता ७० ते ७५ रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. तर ३० रुपयांनी विकली जाणारी चवळी देखील दुपटीने भाव खाऊन गेली आहे. गवार देखील ८० रुपये प्रति किलो विकली जात आहे.
काही दिवस आधी बाजारात १५ रुपयांत किलोभर मिळणारी मेथी आता १५ रुपये पाव झाली आहे. मिरचीच्या दरात गेल्या आठवडाभरात दहा रुपये प्रतिकिलोने वाढ झाली आहे. मात्र ही वाढ फारशी विशेष नाही. या व्यतिरिक्त इतर भाज्यांचे भाव स्थिर आहेत.
कांदे- बटाटे स्वस्तच
सध्या बाजारासह शहरातील काही प्रमुख ठिकाणांवर कांदे विक्री सुरू आहे. ठिकठिकाणहून शेतकरी बाजारात कांदा घेऊन येतात. त्यातील काही शेतकरी कांद्याची २० ते २५ रुपये प्रति किलो दराने विक्री करत आहेत. बटाटे देखील २० ते २५ रुपये प्रति किलो दराने विकले जात आहेत.
भाज्यांचे दर -
भेंडी ७० रुपये किलो
चवळी ६० रुपये
गवार ८० रुपये प्रति किलो
मेथी ६० रुपये
पालक १० रुपये प्रती जुडी
मिरची ४० रुपये प्रति किलो
वांगे ३० रुपये
कोथंबीर ६० रुपये
कांदे २० रुपये
बटाटे २० रुपये