जळगाव : जाहिरात एजन्सीत काम करणाऱ्या ७१ वर्षीय वृद्धाचा राहत्या घरात बाथरूममध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना १८ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. त्रिलोचनसिंग किसनसिंग (७१, रा. पंजाब ह.मु. नवीन बीजे मार्केट जळगाव) असे मयताचे नाव असून या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
त्रिलोचनसिंग किसनसिंग हे शहरातील एका जाहिरात एजन्सीमध्ये डिझायनिंगचे काम करत होते. १८ मार्च रोजी त्रिलोचन हे घराबाहेर पडले नसल्यामुळे त्यांचे सहकारी नवीन बी.जे. मार्केटमधील राहत्या घरी आले. घराचा दरवाजा आतून बंद होता. घरातून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शेजारच्या गॅलरीतून घरात प्रवेश केला. घरात पाहिले असता त्रिलोचनसिंग हे घरात बाथरूमजवळ मयत स्थितीत पडलेले होते. त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे समजले नाही. या प्रकरणी आनंद मल्हारा यांच्या खबरीवरून जिल्हा पेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास जिल्हा पेठ पोलीस कर्मचारी करीत आहेत.