सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवकाबाई नारायण सपकाळे, लीलाबाई व्यंकट सोनवणे (रा.लाडली, ता.धरणगाव) व सिंधूबाई मुरलीधर कोळी (रा.चिंचोली, ता.यावल) या तिघं बहिणी चाळीसगाव येथे लीलाबाई सोनवणे यांची नात जागृती युवराज कोळी हिच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेले होत्या. गुरुवारी हा कार्यक्रम झाल्यानंतर शुक्रवारी सकाळीच आपापल्या गावाला जाण्यासाठी बसने जळगावात आल्या. सिंधूबाई यांची बस लागल्याने लीलाबाई या त्यांना बसपर्यंत सोडण्यासाठी गेल्या, जातांना मोठी बहीण देवकाबाई यांना जागेवरच थांबायला सांगितले होते. सिंधूबाई यांना सोडून परत आल्यावर देवकाबाई जागेवर नव्हत्या, कुठे गेल्या म्हणून शोध घेत असतानाच मनमाड-जळगाव बसच्या मागे एक महिला पडलेली दिसली, पातळावरून ही बहीणच असल्याची खात्री झाल्यावर जवळ जाऊन पाहिले असता बहीणच होती व डोक्यातून मेंदू बाहेर आलेला होता. हा प्रकार पाहून लीलाबाई यांनी एकच आक्रोश केला.
चालकाबाबत पोलीस व महामंडळाकडून टोलवाटोलवी
या घटनेनंतर नागरिकांचा संतापाचा उद्रेक होऊ शकतो, याचा अंदाज घेऊन महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चालक राजू गंगाधर अहिरे याला तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविले. पत्रकारांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे चालकाबाबत चौकशी केली असता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नेण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन चौकशी केली असता चालक येथे नाही, अशी माहिती देण्यात आली. दोन्ही विभागाकडून चालकाबाबत टोलवाटोलवी बचावात्मक पवित्रा घेतला जात होता.
पोलिसांनीच हलविला मृतदेह
या घटनेनंतर पोलीस निरीक्षक विलास शेंडे व सहकाऱ्यांनी तातडीने बसस्थानक गाठले. बसच्या मागे मृतावस्थेत असलेल्या देवकाबाई यांचा मृतदेह तसेच बाहेर आलेला मेंदू एका पिशवीत टाकून शववाहिकेतून शासकीय रुग्णालयात हलविला. पंचनाम्याची प्रकियाही जागेवरच पूर्ण करण्यात आली.