फोटो
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ठाणे जिल्ह्यातील विरार पश्चिम येथील विजय वल्लभ या खासगी कोरोना रुग्णालयात एसीच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत जळगाव शहरातील निवृत्ती नगर येथील नरेंद्र शंकरराव शिंदे यांचाही होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
विरार येथील विजय वल्लभ रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात शुक्रवारी पहाटे सव्वातीन वाजता अचानक एसीच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाला, त्यावेळेस सर्व रुग्ण गाढ झोपेत होते. यानंतर क्षणातच हाहाकार माजला आणि त्यात दहा पुरुष व पाच महिलांचा मृत्यू झाला तर काहीजण गंभीर जखमी झाले. याच विभागात नरेंद्र शिंदे यांच्यावरही उपचार सुरू होते.
मुलाकडे गेले अन् बाधित झाले
नरेंद्र शिंदे हे पेपर मार्टच्या दुकानात कामाला होते. दीड वर्षांपूर्वी ते पत्नीसह टिटवाळा येथे वास्तव्याला असलेला मुलगा कार्तिक याच्याकडे गेले. तेथे मुलगा कार्तिक याला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर काही दिवसात नरेंद्र शिंदे यांनाही लागण झाली. अखेर प्रकृती खालावल्याने त्यांना विरारच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नरेंद्र शिंदे हे मूळचे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील कारंजा येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी अनिता, मुलगी जयश्री असा परिवार आहे. जयश्री विवाहित असून, धुळे येथे सासरी असते. ३५ वर्षांपूर्वी शिंदे हे रोजगारानिमित्त जळगाव येथे आले होते. येथे त्यांचे स्वतःचे घरही आहे. मुलगा कार्तिक हा अभियंता असून, अविवाहित आहे. विरारमध्येच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.