विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना दुचाकीवर मागे बसलेले युसूफ शेख ईस्माईल खाटीक (७८, रा. पारोळा) हे अचानक खाली पडले व त्यांच्या अंगावरून वाहन गेल्याने ते जागीच ठार झाले. तर त्यांचा मुलगा दुचाकीचालक अस्लम शेख युसूफ खाटीक (४४, रा. पारोळा) हे जखमी झाले. हा अपघात शुक्रवार, ५ जानेवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास महामार्गावर गुजराल पेट्रोलपंपासमोरील उड्डाणपुलावर झाला.
पारोळा येथील रहिवासी असलेले युसूफ शेख ईस्माईल खाटीक व अस्लम शेख युसूफ खाटीक हे पिता-पूत्र जळगावला आलेले होते. शुक्रवारी दुपारी ते दुचाकीने (क्र. एमएच १९, ईएफ ७५२४) पारोळा येथे परत जात होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर गुजराल पेट्रोलपंपासमोरील उड्डाणपुलावरून ते जात असताना अस्लम शेख हे समोर जात असलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत होते. त्या वेळी मागे बसलेले त्यांचे वडील युसूफ शेख यांचा अचानक तोल गेला व ते खाली पडले आणि मागून येणाऱ्या भरधाव वाहनाखाली आल्याने ते जागीच ठार झाले.
अपघातानंतर नागरिकांनी धाव घेऊन मृतदेह कापडाखाली झाकला व अपघातग्रस्त वाहन बाजूला करीत वाहनांना मार्ग मोकळा करून दिला. या वेळी वडिलांचा मृतदेह पाहून अस्लम शेख हे नि:शब्द झाले होते. काही वाहनधारकांनी त्यांना धीर दिला. घटनास्थळी तालुका पोलिस पोहचले व त्यांनी मृतदेह व जखमीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले.