लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ६० वर्षांवरील ज्येष्ठांचे शासकीय केंद्रांमध्ये कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. मात्र, या केंद्रांवर पुरेशा सुविधा नसल्याने ज्येष्ठांचे हाल होत असल्याचे गंभीर चित्र कायम आहे. दुसऱ्या मजल्यावर असल्याने जीएमसीचे हे केंद्र बदलून रोटरी भवनात हलविण्यात आले, मात्र, या ठिकाणी सोमवारी साडेसात वाजेपासून आलेल्या ज्येष्ठांना साडे नऊ वाजता कुपन वाटप करण्यात आले व दहा वाजता लसीकरणाला सुरूवात झाली. कुपनसाठी सकाळी साडे आठ वाजताच ज्येष्ठांना बोलावले जात असून ज्याला कुपन मिळाले त्यालाच लस दिली जात असल्याचे चित्र या केंद्रावर आहे.
सोमवारी सकाळी साडे सात वाजेपासून नागरिकांची या ठिकाणी यायला सुरूवात झाली होती. मोठी रांग यावेळी लागलेली होती. दोनशे कुपनचे वाटप करण्यात आले होते. ज्यांना कुपन मिळाले नाही, त्यांना थेट दुसऱ्या दिवशी बोलावले जात होते. कुपन हवे असल्यास सकाळी साडे सात वाजता या असा सल्ला कर्मचारी देत होते. लसीकरण मात्र दहा वाजता सुरू होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व यंत्रणा मायादेवी नगरातील रोटरी भवनात हलविण्यात आली आहे. या ठिकाणी दोन ठिकाणी कागदपत्रे प्रमाणीत केली जात आहे. एक डॉक्टर व तीन परिचारिका या ठिकाणी कार्यरत असून प्रतिक्षालय व निरीक्षण कक्ष या ठिकाणी आहे. प्रतिक्षालयात एकावेळी २८ लोक बसू शकतील इतकी व्यवस्था करण्यात आली आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत ६३ लोकांचे लसीकरण पूर्ण झाले होते व नोंदणी सुरू होती.
खुर्च्या सुद्धा नाही
सकाळपासून रांगेत उभे राहून दमलेले अनेक ज्येष्ठ परिसरातील लॉनवरच बसून होते. काही तर थेट झोपले होते. तरीही त्यांना बसायला साध्या खुर्च्याही देण्यात आलेल्या नव्हत्या. साडे अकराच्या सुमारास आतून वीस ते पंचवीस खुर्चा देण्यात आल्या. त्यावेळी काही ज्येष्ठ त्यावर बसले व प्रशासनाला आता आम्ही दिसलो का अशी खंतही ते व्यक्त करीत होते.
आधी क्रमांकाचे कुपन दाखवा..
सकाळी साडे आठ वाजता आल्यानंतर आधी कुपन वाटप केले जाते, त्यानुसार मिळालेल्या क्रमांकानुसार पुढील प्रक्रिया केली जाते. यासाठी नागरिकांना सकाळी साडे सात वाजताच बोलावले जाते. त्यानंतर आलेल्यांना थेट बाहेरूनच परत पाठविले जात आहे. अनेकांनी दुसऱ्या डोसचीही विचारणा केली त्यांनाही कुपन घ्या आणि उद्याच या असा सल्ला देण्यात आला. दिवसाला दोनशेच लोकांना लस दिली जाईल, असे सांगण्यात येत होते.
कोट
आम्ही सकाळी आठ वाजेपासून आलो, दहा वाजता आम्हाला कुपन मिळाली. शेवटपर्यंत मोठी रांग या ठिकाणी होती. अनेक लोक सकाळी साडेसात वाजेपासून रांगेत उभे आहेत. कुपनच्या नंबरनुसारच लस दिली जात आहे. आज त्यांनी दहा वाजता कुपन दिले. अनेकांना उद्या सकाळी साडे आठवाजता बोलावले आहे. - एक ज्येष्ठ नागरिक