जळगाव : रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रॅक्टरवर मागून आलेली दुचाकी धडकल्याने त्यात प्रल्हाद तोताराम सोनवणे (७१,रा. विटनेर,ता.जळगाव) हे वृद्ध जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री आठ वाजता पाचोरा रस्त्यावरील रामदेववाडीजवळ घडली.
बिघाड झालेले ट्रॅक्टर रामदेववाडी जवळ बंद पडले होते. त्यामुळे चालकाने ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला लावलेले होते. यावेळी जळगाव येथून नातवासोबत येत असलेले प्रल्हाद सोनवणे यांची दुचाकी ट्रॅक्टरवर धडकली त्यात सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेला नातू हर्षल किरकोळ जखमी झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर म्हसावद दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी शशिकांत पाटील व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन सोनवणे यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. पनवेल येथे वास्तव्यास असलेल्या नातेवाईकाचे साहित्य ट्रॅव्हल्स बसवर पोहचविण्यासाठी ते जळगावला गेले होते. तेथून परत येत असताना हा अपघात झाला.