जळगाव : सेवानिवृत्तीचे वेतन हातात घेतल्यानंतर पासबुकची प्रिंटरवर एन्ट्री करत असतानाच वृध्दाच्या खिशातून 17 हजार रुपयांची रोकड अवघ्या दहा मिनिटात लांबविण्यात आल्याची घटना नवी पेठेतील बॅँक ऑफ इंडीया या बॅँकेच्या मुख्य शाखेत गुरुवारी दुपारी एक वाजता घडली. दरम्यान, यातील संशयित महिला बॅँकेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्या असून पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतले आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातून निवृत्त झालेले तुरेबाज बलदार तडवी (78 रा.व्यंकटेश नगर, हरिविठ्ठल, जळगाव) हे सेवानिवृत्तीचे नियमित व वाढीव वेतन घेण्यासाठी गुरुवारी दुपारी बॅँक ऑफ इंडीया या बॅँकेच्या मुख्य शाखेत आले होते. तेथे त्यांनी 17 हजार काढले व खिशात ठेवेल. त्यानंतर प्रिंटरवर पासबुकची एन्ट्री मारत असताना काही क्षणातच खिशातील रक्कम गायब झाल्याचे लक्षात आले. यावेळी त्यांच्या मागे काही महिला उभ्या होत्या व त्यात दोन महिला संशयित आढळून आल्या. तडवी यांनी हा प्रकार लागलीच वरिष्ठ व्यवस्थापक ए.डब्लु. जहागीरदार व मुलगा विनोद तडवी (बस वाहक) यांना सांगितला. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून तडवी यांना पोलीस स्टेशनला पाठविले. बॅँकेत नेहमी एक सुरक्षा रक्षक असतो, मात्र गुरुवारी हा सुरक्षा रक्षक रजेवर होता अशी माहिती वरिष्ठ व्यवस्थापक जहागीरदार यांनी दिली.बॅँकेत आलेल्या संशयित महिला या रांगेत न थांबता प्रिंटर मशीनजवळ कर्ज विभागात जाणा:या जिन्याला लागून थांबलेल्या होत्या. वयोवृध्द व्यक्तींवर नजर ठेवून होत्या. तडवी यांनी रक्कम काढल्यानंतर ती मोजत असताना या महिलांचे त्यांचे लक्ष होते. प्रिंटर मशीन जवळ येताच त्यांच्या खिशातून रक्कम काढून त्यांनी काढता पाय घेतला.
वृध्दाच्या खिशातून 17 हजार लांबविले
By admin | Published: January 06, 2017 12:44 AM