जैताणे - जिवंतपणी अत्यंत काबाडकष्ट करून पदरी पडलेल्यो अठराविश्व दारिद्र्याशी संघर्ष करणाºया नामदेव भगवान माळी या वृद्धाचे २८ डिसेंबरला निधन झाले. त्यांना मुलगा नसल्याने त्यांच्या अंत्यविधीसाठी साक्री तालुक्यातील तरुण मंडळींनी एकत्र येत २० हजार रुपये लोकवर्गणी जमा करून त्यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम केला. शिंदखेडा तालुक्यातील दाऊळ येथील त्यांच्या भाऊबंदकीतील एका मुलाच्या हस्ते त्यांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम पार पडला. नामदेव माळी यांच्या निधनानंतर त्यांच्या घरात पैशाची एकही दमडीही नव्हती. त्यामुळे त्यांच्या दशक्रिया विधीचा प्रश्न उपस्थित झाला होता. तेव्हा जैताणे येथील चावडी चौक मित्र मंडळ, शिवाजी व्यायामशाळा मित्र मंडळ व सरपंच संजय खैरनार, मोहन गायकवाड, धनजी जाधव, बापू बोरसे, गोकूळ पाटील यांनी परिसरातून वर्गणी गोळा करून केली. नामदेव माळी हे मूळचे दाऊळ येथील होते. मात्र, गेल्या २८ वर्षांपासून जैताणे येथे ते राहत होते. शरीरात शक्ती असेपर्यंत ते व त्यांची पत्नी गंगाबाई काबाडकष्ट करून उदरनिर्वाह करीत होते. परंतु, त्यांचे हातपाय थकल्यानंतर नामदेव माळी हे जैताणे येथील संत सावता मंदिर येथे सेवेकरी म्हणून काम करीत होते. पहाटे ४ वाजेपासून ते देवाच्या आराधनेत तल्लीन असायचे. त्यांच्या पत्नीला कॅन्सर या दुर्धर रोगाने ग्रासले होते. त्यांनाही चालता येत नव्हते. ही मोठी अडचण त्यांच्यासमोर असताना अचानक त्यांचे निधन झाल्याने त्यांच्या पत्नीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मृत्यूनंतर त्यांच्या मृतदेहाची हेळसांड होऊ नये म्हणून संवेदनशील युवकांनी लोकवर्गणीतून त्यांचा अंत्यविधी केला.
वृद्धाच्या दशक्रिया विधीसाठी तरुणाईने जमा केली लोकवर्गणी
By admin | Published: January 04, 2017 12:26 AM