जळगाव : भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारे स्थान म्हणून ओळख असलेल्या शहरातील ओंकारेश्वर मंदिरावर श्रावण मासानिमित्त शिवभक्तांची गर्दी होणार आहे. ५० वर्षांची परंपरा असलेल्या या शिवस्थानावर श्रावण सोमवार निमित्त स्वयंभू शिवपिंडाच्या दर्शनाचा लाभ भाविकांना दिवसभर होणार आहे.जयनगरात असलेल्या श्री ओंकारेश्वर देवस्थान ट्रस्टच्या श्री ओंकारेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे नवसातून बांधण्यात आलेले हे मंदिर आहे.संस्थेचे संस्थापक सदस्य असलेले मिश्रीलाल ओंकारदास जोशी यांना १९६३मध्ये पोटशुळाचा त्रास होऊ लागला. बरेच दिवस उपचार केले तरी त्याचा फायदा झाला नाही. त्यामुळे जोशी यांनी त्यांच्या बंधूंकडे सन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र त्यास घरातील मंडळींनी नकार दिला. तरीही मिश्रीलाल जोशी हे आपल्या निश्चयावर ठाम राहिले. त्यानुसार ते अंगावरील कपड्यावरच काशी येथे निघून गेले. इकडे त्यांच्या बंधूंनी मिश्रीलाल जोशी यांचा पोटशुळाचा आजार बरा होण्यासह ते परत आल्यास शिवमंदिर बांधण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार काही दिवसांनी मिश्रीलाल जोशी यांचा आजार बरा झाला व ते परतही आले. त्यानुसार येथे ओंकारेश्वर मंदिर आकारास आले.दोन वर्षात मंदिर बांधून तयार१७ आॅगस्ट १९६६ रोजी श्री ओंकारेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करण्यात येऊन व तेव्हापासून मंदिराच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर १९६८मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण होऊन ८ फेब्रुवारी १९७१ रोजी यज्ञ महाऋषी ब्रजमोहन व्यास यांच्याहस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.स्वयंभू शिवपिंडया मंदिरात स्थापना करण्यासाठी स्वयंभू शिवपिंड असावी अशा मनोदयाने नर्मदा नदी किनारी असलेल्या श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान (मध्यप्रदेश) येथे विश्वस्त गेले. मात्र तेथे स्वयंभू शिवपिंड मिळणे कठीण असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे विश्वस्त माघारी परतले. काही दिवसांनी तेथून संदेश आला तो स्वयंभू शिवपिंड असण्याचा. त्यानुसार पुन्हा तेथे विश्वस्त गेले व तेथून स्वयंभू शिवपिंड आणून तिच्यासह इतरही मूर्तींची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून येथे शिवभक्तांची गर्दी होऊ लागली व नवसही केले जाऊ लागले. आज राज्यभरात या मंदिराची अख्यायिका पोहचली असून श्रावण मासासह महाशिवरात्र, श्रीराम नवमी, श्रीकृष्णा जन्माष्टमीला येथे राज्यभरातील भाविक हजेरी लावून शिवचरणी लीन होतात.सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचालहे देवस्थान सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत असून फेब्रुवारी २०२०मध्ये सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संस्थानच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विश्वस्त जुगल जोशी यांनी दिली. संस्थानचे अध्यक्ष गजानन पन्नालाल जोशी, सचिन विष्णू जोशी यांच्यासह इतर विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.मंदिरात विवेक जोशी, आशीष पांडे, रामभजन मिश्र हे पौराहित्य करतात.
श्रावण सोमवार विशेष : भाविकांचे श्रद्धास्थान - जळगावातील ओंकारेश्वर मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 11:57 AM
स्वयंभू शिवपिंडाच्या दर्शनाचा आज दिवसभर लाभ
ठळक मुद्देदोन वर्षात मंदिर बांधून तयारसुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल