- कुंदन पाटीलजळगाव : स्वभावधर्मानुसार त्याने महापुरातून दोघांना बुडताना वाचविले. बालवीर म्हणून केंद्र सरकारकडून दिल्लीत गौरव झाला. ऊसतोड्या करण बालू तडवी याच्या वाट्याला आलेली ही दिवाळी फार दिवस टिकली नाही. त्याच्या हातात पुन्हा कोयता आला असून आयुष्याचा फड पूर्ववत उसाच्या फडात रंगला आहे. करण तडवी हा चिंचपुरे (पाचोरा, जळगाव) येथील रहिवासी आहे. २०१९ मध्ये पाचोऱ्याच्या बहुळा नदीत वाहून जाणाऱ्या दोघांना करणने काठावर आणले होते. तेव्हा तो १६ वर्षांचाच होता. त्याच्या या धाडसाची केंद्रीय पातळीवर दखल घेतली गेली.
ऊसतोड झाल्यावर करण शिकणार आहे. गावकरीही मदत करणार आहेत. या हंगामात थोडे पैसे हातात आल्यावर गावी येऊ. मग करणला आम्ही पुन्हा शाळेत पाठवू.- नगीना तडवी, करणची आई
आपल्याला एवढा मोठा पुरस्कार मिळालाय, हे करणच्या गावीही माहीत नव्हते. ही बातमी आली तेव्हा करणसह त्याचे कुटुंबीय ऊसतोडणीसाठी पुणे जिल्ह्यात होते. करणशी संपर्क साधणेही तेव्हा कठीण गेले. सैन्य दलातून निवृत्त झालेले समाधान पाटील या सुभेदाराने करणला शोधून काढत स्वखर्चाने गावी आणले आणि त्याची दिल्लीवारीही घडविली.
गावानेही केला गाैरवnसुभेदार पाटील यांना यातून मोठे ‘समाधान’ वाटले. करणला घेऊन ते गावी आले आणि बक्षिसाची रक्कम जमा करण्यासाठी त्यांनी बँकेत करणचे खाते उघडले. गावानेही करणचा गौरव केला... nपुढे दोन-तीन दिवस करणचे हालहवाल कळले नाहीत. पुरस्काराचे पैसे किती दिवस पुरतील, कमविलेले नावही किती दिवस पुरेल... nम्हणून तो पुन्हा ऊसतोडणीला जुंपलेला आहे. ऊस तोडणे म्हणजेही सेवाच असून आम्ही समाजात साखर पेरतो, असे अभिमानाने सांगतो.