निलंबनावर उल्हास पाटील म्हणाले, ही तर एकाधिकारशाही ! दोन दिवसात निर्णय घेऊ
By सुनील पाटील | Published: January 22, 2024 08:08 PM2024-01-22T20:08:51+5:302024-01-22T20:09:00+5:30
काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी पक्षावर टीका केली आहे.
जळगाव: कॉग्रेस पक्षासाठी आपण आंदोलने केली, सर्व कार्यक्रम यशस्वी केले. भार उचलला. आजही आंदोलनाच्या केसेस कोर्टात सुरु आहे. कॉग्रेस पक्षासाठी काय नाही केले, असे असताना चर्चा नाही, किंवा शोकॉज नाही थेट निलंबनाची कारवाई केली. आज देश नव्हे जगात आनंदोत्सव साजरा होत असताना निलंबनाचे पत्र हातात पडले ही तर एकाधिकारशाही असल्याची टिका माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी कॉग्रेस पक्षावर केली.
कॉग्रेस पक्षाने डॉ.उल्हास पाटील, त्यांच्या पत्नी डॉ.वर्षा पाटील व युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांना सोमवारी पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित केले.त्यानंतर या तिघांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. आपल्याला निलंबित करण्याचे अधिकार नाना पटोले यांना देखील नाहीत. यासंदर्भात युवक कॉग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी देखील आपल्याला फोन करुन ही कारवाई चुकीची असल्याचे सांगितल्याचे मराठे म्हणाले. पक्षात कारवाया करण्यापेक्षा बुथ यंत्रणा कशा सक्षम होतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. भविष्याची दिशा कशी असेल या प्रश्नावर बोलताना दोन दिवस थांबा, तेव्हा जाहिर करु असेही डॉ.उल्हास पाटील म्हणाले.
केतकी पाटील मोदींच्या कार्याने प्रभावित
कन्या डॉ.केतकी पाटील ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याने प्रभावित झाली आहे. मोदींने जगात देशाचे नाव लौकिक मिळवले. त्यांची कार्यपध्दत बघून तीने भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. तो तिचा अधिकार आहे. आजपर्यंत ती कोणत्याच पक्षाची सदस्य नाही. २४ जानेवारी रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित डॉ.केतकी पाटील मुंबईत भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना त्यांनी दुजोरा दिला. उमेदवारीबाबतही त्यांनी सूचक वक्तव्य केले.
अशा कारवाईने व्यथित
पक्षाने कोणतीही चर्चा किंवा पूर्व सूचना न देता ज्या पध्दतीने निलंबनाची कारवाई केली, त्यामुळे आपण व्यथीत झालो आहोत असे डॉ.पाटील म्हणाले. आजच्या कारवाईमुळे काही तरी निर्णय घ्यावाच लागेल असे सांगून त्यांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिले.