जळगाव : गणेश कॉलनी येथील शासकीय महिला आशादीप वसतिगृहातील मुलींचे मोबाइलमध्ये व्हिडिओ चित्रण करून ते व्हायरल केल्याच्या प्रकरणात साहील अयूब पठाण (२२, रा. चांदसर, ता. धरणगाव) याला जिल्हापेठ पोलिसांनी शनिवारी अटक केली.
२ मार्च रोजी दुपारी १ वाजता साहील पठाण याने आशादीप वसतिगृहातील मुलींचे मोबाइलमध्ये मुलींचे व्हिडिओचित्रण केले होते, तसेच हा व्हिडिओ व्हायरल केला होता. त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्याने प्रवेशद्वारावर लाथ मारून वसतिगृह कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी संजना सचिन पाटील (३२, रा. वरणगाव) यांच्या फिर्यादीवरून ८ मार्च रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. साहील याला दोन दिवसांपूर्वी रामानंद पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. शनिवारी त्याला या गुन्ह्यात अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता त्याला जामिनावर मुक्त करण्यात आले. सरकारकडून ॲड. आशा शर्मा यांनी काम पाहिले.