जळगाव : रस्त्याने पायी किंवा दुचाकीवर असताना मोबाईलवर बोलत असलेल्या लोकांचे मोबाईल लांबविणाºया दिनकर उर्फ पिन्या रोहीदास चव्हाण (रा.सुप्रीम कॉलनी) या सराईत गुन्हेगाराला एमआयडीसी पोलिसांनी रविवारी जंगलातून अटक केली. त्याच्याकडून चोरीचे चार मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. दरम्यान, त्याचा एक साथीदार अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले.२१ फेब्रुवारी रोजी रात्री ८.१५ वाजता एमआयडीसीतून जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी प्रदीप उत्तम चव्हाण (रा.सुप्रीम कॉलनी) यांचा मोबाईल हिसकावून पळ काढला होता.त्याचवेळी चव्हाण यांच्या पुढे चालत असलेले धनंजय बाळू माळी (रा.नशिराबाद) यांचा मोबाईल हिसकावला. त्यानंतर दहाच मिनिटात सुमेरसिंग ढाब्याजवळ प्रमोद राजेंद्र सूर्यवंशी (रा.नितीन साहित्या नगर) यांचाही मोबाईल या दोघांनी लांबविला. पुढे लगेच पायी चालत असलेले संजय कडुबा सनगर (रा.कुुसुंबा, ता.जळगाव) यांचाही मोबाईल हिसकावला होता. अवघ्या ४० मिनिटात या दोघांनी चार मोबाईल लांबविले.जंगलात केला पाठलागपोलिसांनी केलेल्या चौकशीत एकाचवेळी चार मोबाईल लांबविणारा हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार पिन्या असल्याचे निष्पन्न झाले.पिन्या हा कुसुंबा येथील जंगलात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांनी सहायक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, आनंदसिंग पाटील, सचिन चौधरी, मुकेश पाटील, इम्रान सय्यद, गोविंदा पाटील, मुदस्सर काझी, सतीश गर्जे, योगेश बारी, सचिन पाटील व असीम तडवी यांचे पथक रवाना केले. पोलिसांना पाहून पिन्या याने जंगलात पळ काढला, मात्र सचिन चौधरी व मुकेश पाटील या दोघांनी दोन कि.मी.पाठलाग करुन त्याच्या मुसक्या आवळल्या.
रस्त्याने चालणाऱ्या लोकांचे मोबाईल हिसकावणा-या एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 10:22 PM