स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे महत्वाचे आहेच. तथापि प्रशासनात तुम्हाला मिळालेल्या जबाबदारीला तुम्ही कसा न्याय देतात. त्यात कोणती पथदर्शी कामे करतात, हेही तितकेच किंबहुना जास्तच महत्वाचे आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना काही वेगळ्या युक्त्या जरुर वापराव्यात. अनेक पुस्तके वाचण्यापेक्षा एकच पुस्तक पुन्हा पुन्हा वाचणे, हादेखील यशाचा मंत्र ठरतो.- नंदकुमार दत्तात्रय वाळेकर, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, चाळीसगाव
चाळीसगाव, जि.जळगाव : २०१० मध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली, तेव्हा पोलीस उपनिरीक्षक व्हावे, अशी इच्छा होती. पहिल्याच प्रयत्नात मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालो. मुलाखतीपर्यंत पोहचलो. मात्र त्याचवेळी जेवणातून विषबाधा झाल्याने संधी हुकली. पुढे याच परीक्षेत राज्यात सर्वप्रथम येण्याची यशस्वी मुद्रा कोरली. २०११ मध्ये एमपीएससी परीक्षा देऊन गटविकास अधिकारीपदी रुजू झालो...' चाळीसगावचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी आपल्या खडतर यशाचा असा प्रवास उलगडून दाखविला. 'लोकमत'शी त्यांनी संवाद साधला.प्रश्न :: गटविकास अधिकारी पदापर्यंत यश कसं मिळालं?वाळेकर : बेडग हे माझं छोटंसं गाव. मीरज तालुका व सांगली जिल्ह्यातील गाव.एमए इंग्रजी.,बी. एड. असं शिक्षण झाले असून २०१० एमपीएससीच्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत महाराष्ट्रात सर्वप्रथम त्यानंतर पुन्हा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मंत्रालय सहाय्यक, गटविकास अधिकारी या पदावर ही निवड झाली.मी माझं दहावीपर्यंत शिक्षण गावातच पूर्ण केलं. परंतु त्यानंतर परिस्थिती थोडी नाजूक असल्याकारणाने इंजीनियरिंग, डिप्लोमा किंवा सायन्स शाखा निवडता आली नाही. मी कला शाखा निवडली. या शाखेतूनच पदव्युत्तर शिक्षण घेतलं. त्यानंतर बी.एड.पूर्ण केले. मात्र शिक्षक म्हणून नोकरी मिळण्यात मला बऱ्याच अडचणी आल्या. त्यामुळे मी स्पर्धा परीक्षेकडे वळलो. सुरुवातीला पोलीस सब इन्स्पेक्टर व्हावं, अशी इच्छा होती. त्यामुळे जोरदार प्रयत्न केला. पहिल्याच प्रयत्नात मुख्य परीक्षा पास होऊन मुलाखतीपर्यंत पोहोचलोही. एके ठिकाणी जेवणामधून विषबाधा झाल्यामुळे ही संधी हुकली. त्यानंतर मी याच परीक्षेत राज्यात पहिलाच येण्याचा निर्धार केला. पुन्हा जोमाने प्रयत्न केला. पीएसआय परीक्षेमध्ये मी राज्यात प्रथम आलोसुद्धा. त्यानंतर एमपीएससी राज्यसेवा परीक्षेतून गटविकास अधिकारी झालो.प्रश्न : सध्या काय करता?वाळेकर : मागील महिन्यातच नवापूर तालुक्यातून चाळीसगाव येथे गटविकास अधिकारी म्हणून माझी बदली झाली. सध्या चाळीसगाव येथे गटविकास अधिकारीपदी कार्यरत आहे.प्रश्न : स्पर्धा परीक्षा आणि त्यानंतरची जबाबदारी याविषयी काय सांगाल ?वाळेकर : एमपीएससी पास होणे महत्त्वाचे आहेच. त्याबरोबरच तुम्ही अधिकारी झाल्यावर काय करता हेही महत्त्वाचं असतं. नवापूरला गटविकास अधिकारी असताना महाराष्ट्रात सर्वाधिक २०७२ घरकुले पूर्ण करून तालुक्यातील पक्क्या घरांचे प्रमाण ४४ टक्क्यांहून ८५ टक्क्यांपर्यंत नेले. महाराष्ट्रातील पहिला हागणदारीमुक्त आदिवासी तालुका बनवला. राज्यातील पहिला डिजिटल शाळांचा तालुका अशी भरारी घेतली. उत्कृष्ट अंगणवाड्यांची निर्मिती केली. कुपोषणाचं प्रमाण तालुक्यातून कमी करण्याचा प्रयत्न केला. पेसा कायदा अंतर्गत गवत कापणी, मासेमारी, बाजार व्यवस्थापन असे अनेक उपक्रम यशस्वी केले. वनराई बंधारे, मनरेगातून गाळ काढणे. याद्वारे तालुक्यात जलसंधारणाचे मोठं काम उभं केलं. लॉकडाउनच्या काळात मनरेगाच्या माध्यमातून १९ हजार कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिला. पाणी गुणवत्तेसारख्या विषयात सलग चार वर्ष देशात प्रथम स्थान मिळवले. सध्या चाळीसगाव तालुक्यात मृदा, जल, शिक्षण , आरोग्य आणि आणि ग्राम विकासाच्या कामांचे नियोजन सुरू आहे. लोकाभिमुख प्रशासनासाठी माझा कायमच आग्रह असतो.प्रश्न : अभ्यासाची पध्दत कशी होती?वाळेकर : एमपीएससी परीक्षा ही पदवी, पदव्युत्तर परीक्षा किंवा डिप्लोमा यापेक्षा वेगळी असते. केवळ पाठांतर करून जमत नाही. संदर्भासह वाचन असले पाहिजे, चिंतनही असले पाहिजे. विषय समजून घेतला पाहिजे. मुलाखतीला संदर्भासह बोलणं, मुद्देसूद बोलणं आणि स्पष्ट बोलणे याला खूप महत्त्व असते. अभ्यास करत असताना इतिहास हा कथारूपाने वाचला पाहिजे. भूगोल हा नकाशावर अभ्यास करायला पाहिजे आणि विज्ञान हे अनुभवातून प्रयोगातून लक्षात ठेवायला पाहिजे. प्रत्येक विषय वाचताना वेगळ्या पद्धतीने लक्षात ठेवावा लागतो. जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव करणेसुद्धा आवश्यक असतं. त्यामध्ये आपलं काय चुकतंय हे तपासून पुन्हा प्रश्नपत्रिका सोडवाव्या लागतात. अनेक पुस्तके एकदा वाचण्यापेक्षा एकच पुस्तक अनेकदा वाचलं हासुद्धा यशाचा एक मंत्र आहे.प्रश्न : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाईला काय संदेश देणार?वाळेकर : आपल्या आयुष्यातली दोन ते तीन वर्ष जर आपण मन लावून अभ्यास केला तर आपलं भविष्य उज्वल आहे. केवळ प्रशासन - शासन याच्यावर टीका करण्यापेक्षा प्रत्यक्ष त्याचा एक भाग होऊन आपल्यापरीने देशासह काही समाजात काही बदल घडवता येईल का? हे आजच्या तरुणाईने पाहणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षा ही केवळ बुद्धीची परीक्षा नसते. तर ती तुमचा भावनिक बुद्ध्यांक , संयम, महत्त्वाकांक्षा, जिद्द, चिकाटी व कष्ट करण्याची वृत्ती यासगळ्यांचे सार म्हणजे स्पर्धा परीक्षेत यश असते. हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.प्रश्न : काय करावे आणि काय करू नये, काही युक्त्या असतील तर सांगाल ?वाळेकर : स्पर्धा परीक्षेसाठी वेळेचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. अभ्यास करत असताना कोणत्या विषयाला किती महत्त्व आहे. हे लक्षात घेऊन अभ्यास करावा. पुस्तकांची निवड अचूक असावी. अनेक पुस्तके एकदा वाचण्यापेक्षा एकच पुस्तक अनेकदा वाचावं. पुस्तकातील जितकं लक्षात राहत नाही इतक्यातच नोट्स काढाव्यात. एका पुस्तकाच्या केवळ दोन ते तीन पानातच मायक्रोमोटर असल्या पाहिजेत. समूह चर्चेवर भर देणे आवश्यक आहे.स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-याने सतत सकारात्मक रहायला शिकले पाहिजे. नियमित व्यायाम करून मन प्रसन्न ठेवावे. नकारात्मक लोक, नकारात्मक जागा आणि नकारात्मक बोलणं त्यापासून दूर राहणे आवश्यक आहे. ग्रामीण भागाचा न्यूनगंड बाळगू नये. स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा सुद्धा न्यूनगंड बाळगू नये व्यक्तिमत्व विकसित करता येतं, ही बाब लक्षात ठेवावी.प्रश्न : आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीविषयी काय सांगाल ?वाळेकर : सांगली जिल्ह्यातील कर्नाटक सरहद्दीवर असलेल्या बेडग हे माझं गाव. शेती हा आमच्या घरचा पारंपारिक व्यवसाय. वडील शेतमजूर होते. बैलजोडी घेऊन दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करत असत. एका साध्या मातीच्या घरात दोन सायकली, चार जणांवर आणि सात -आठ माणसं असा आमचं एक कुटुंब राहत होतं. आजारपण तसेच दैनंदिन असणारा खर्च. अशा बऱ्याच आर्थिक विवंचना होत्या. त्यामुळे लहान असताना परिस्थिती थोडीशी नाजूकच होती. मी मात्र हार न मानता लढत राहिलो. सरतेशेवटी यशस्वी झालो.---