प्रश्न झाला बिकट : पंधरा दिवसात २७ जणांना चावा
डमी
१ हजार रुपये
एका श्वानाच्या निर्बिजीकरणावर होणारा खर्च
एका कंपनीला देण्यात आला मक्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न अधिकच बिकट होत असून, गेल्या ११ महिन्यात शहरात भटक्या श्वानांच्या हल्ल्यात २७५ जण जखमी झाले आहेत तर एका बालकाचा मृत्यू झाला आहे. मनपाने भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी अमरावती येथील एका संस्थेला दीड कोटींचा मक्ता दिला होता. मात्र, केंद्र शासनाच्या ॲनिमल वेलफेअर समितीने प्राणीमित्रांच्या तक्रारीनंतर तीनच महिन्यात हे काम थांबवले आहे. या तीन महिन्यात मनपाकडून केवळ २०० भटक्या श्वानांवर ही शस्त्रक्रिया होऊ शकली.
मनपाने श्वानांच्या निर्बिजीकरणाचे काम थांबवून आता ९ महिन्यांहून अधिक कालावधी झाला असून, शहरातील भटक्या श्वानांची संख्या १९ हजारांच्या घरात गेली आहे. शहरात वाढत जाणाऱ्या या श्वानांकडून होणाऱ्या हल्ल्याचा घटना पाहता, नागरिकांमध्ये कमालीची भीती पाहायला मिळत आहे. शहरातील वाढीव भागात याचा सर्वाधिक धोका असून, याबाबत मनपाकडून कोणतीही कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही. केंद्र शासनाच्या ॲनिमल वेलफेअर या संस्थेनेच हे काम थांबविल्याने मनपाकडून शहरातील या भीषण समस्येबाबत आतापर्यंत कोणताही ठोस पाठपुरावा झालेला नाही.
हजारो श्वानांसाठी व्यवस्थाच नाही
शहरातील श्वानांची संख्या आता १९ हजारांच्या घरात पोहोचली आहे. मात्र, मनपाकडून कोणतेही नियोजन नसल्याने ही संख्या याच वेगाने वाढण्याची शक्यता आहे. तसेच मनपाकडून आधी डॉग व्हॅनद्वारे श्वान पकडल्यानंतर त्यांना शहराबाहेर सोडण्यात येत होते. मात्र, हे कामदेखील आता बंद आहे.
वाघ नगर, शिवाजी नगर भागात दहशत
शहरातील वाढीव भागासह शहरातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यांलगत भटक्या श्वानांची सर्वाधिक भीती आहे. यामध्ये वाघ नगर भागात गेल्या पंधरा दिवसात भटक्या श्वानांनी हल्ला केल्याच्या १५पेक्षा अधिक घटना घडल्या आहेत. यासह निमखेडी, शिरसोली रस्ता, शिवाजी नगरसह कांचन नगर, आसोदा रोड, कानळदा रोड या परिसरातही श्वानांची सर्वाधिक भीती आहे.
दररोज ५ घटना
शहरातील भटक्या श्वानांनी केलेल्या हल्ल्यांच्या संख्येत आता दिवसेंदिवस वाढ होत असून, शहरात सरासरी अशा ५ घटना होत आहेत. यावर तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
कोट..
शहरातील समस्यांबाबत ॲनिमल वेलफेअर संस्थेशी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु असून, शहरातील भटक्या श्वानांच्या समस्येबाबतची माहिती दिली आहे. केंद्राकडून सूचना आल्यानंतर याविषयी तत्काळ नियोजन करण्यात येईल.
- पवन पाटील, आरोग्य अधिकारी, मनपा