जळगाव- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात बुधवारी एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर अभाविप महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री सिद्धेश्वर लटपटे, जिल्हा संयोजक रितेश चौधरी आणि आदेश पाटील उपस्थित होते.कार्यक्रमात पहिल्या सत्रात अभाविप महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री सिद्धेश्वर लटपटे यांनी अभाविप परिचय मांडणी केली. यात अभाविप गेल्या ७२ वर्षांपासून कशाप्रकारे एक दंड शक्ती म्हणून कार्य करत आहेत, याबाबत माहिती दिली व दुसऱ्या सत्रात ग्रेट भेट प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी आजचा विद्यार्थी कसा असावा व आपल्या कार्याबद्दल ध्येयनिष्ठ असावा विविध विषयांवर विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. तिसऱ्या सत्रात विविध क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे गट करून गटश: चर्चासत्र झाले. दुपार सत्रात टीम बिल्डींग या विषयावर प्रा. डॉ. विवेक काटदरे यांनी विद्यार्थ्यांना संघटनात्मक काम करताना कशा पद्धतीने व कोणत्या उद्देशाने कार्य करावे? या विषयावर मार्गदर्शन केले.