पाचोरा : मांडूळ जातीच्या सापासह तलवार बाळगल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने आरोपीस पाचोऱ्यातून अटक केली.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील वल्लभनगर भागात राहणारा निलेश उर्फ बंटी भानुदास पाटील (वय १९) रा. राजुरी, ता.पाचोरा ह.मु.वल्लभनगर याच्याकडे मांडूळ जातीचा साप असल्याची गुप्त बातमी एलसीबी पथकाला मिळाली. त्याआधारे १६ रोजी रात्री सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शोध घेत आरोपीच्या घराची झाडाझडती घेतली. यावेळी घराच्या गच्चीवर एक किलो वजनाचा दोन तोंडी साप, २०० ग्राम फिक्कट तपकिरी रंगांचा १४० सेमी लांबीचा मांडूळ जातीचा साप आढळून आला. घराची झाडाझडती घेतेवेळी एक १७ इंच लांब पिवळ्या रंगाच्या धातूची मूठ असलेली तलवार आढळून आली. पोलिसांनी मुद्देमालासह आरोपीस अटक केली. याप्रकरणी पाचोरा पोलिसात एलसीबी पोलीस हेडकॉन्स्टेबल विलास बाबुराव पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला असून आरोपीस २ दिवसाची कोठडी सुनावली. या पथकात अनिल देशमुख, शरद भालेराव, विनोंद पाटील, रामकृष्ण पाटील, वैशाली सोनवणे यांनी सहकार्य केले.