जळगाव : जिल्ह्यात सुरू असलेल्या गुटखा विक्री व वाहतूक विरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने मोहीम उघडली असून बुधवारी रावेर येथे अन्न व औषध प्रशासन व रावेर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत मध्यप्रदेशातून आलेला एक लाख ९ हजार ८२ रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी रावेर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.मध्यप्रदेशातून गुटखा येत असल्याची माहिती मिळाल्याने अन्न व औषध प्रशासन विभाग व रावेर पोलिसांनी सापळा रचत रावेर येथे मध्यप्रदेशातून आलेली कार (क्रमांक एमएच १९, क्यू -२९५५) पकडला. त्याची तपासणी केली असता त्यात गुटखा असल्याचे आढळून आले. वाहनचालक साजिदखान युसुफ खान व त्याच्यासोबत मालक शोयब खान युसुफ खान (रा. बाबुजीपुरा, यावल) हेदेखील होते. कारमध्ये आढळेल्या गुटख्याची किंमत एक लाख ९ हजार ८२ रुपये असून या गुटख्यासह कारही जप्त करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने रावेर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) वाय.के. बेंडकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी, विवेक पाटील, समाधान बारी यांच्यासह पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी ही कारवाई केली.यामधील मुख्य सूत्रधाराचा शोध घेतला जात असून जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने गुटख्याविरुद्ध कारवाई तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
रावेर येथे एक लाखाचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 12:26 PM