जळगाव : चोरीच्या सात दुचाकीसह एक चोरटा ताब्यात घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेंदुर्णी, ता.जामनेर येथे आणखी चोरीच्या ९ दुचाकी व एका चोरट्याला ताब्यात घेतले. गणेश बाबुलाल राजपूत (रा.जंगीपुरा, ता. जामनेर) असे चोरट्याचे नाव आहे. चोरी उघड होऊ नये म्हणून गणेश याने चोरलेल्या दुचाकींच्या नंबर प्लेट बदल केल्या होत्या.शेंदुर्णी येथे गणेश राजपूत या तरुणाकडे विना नंबर असलेली चोरीची दुचाकी व तिच्या पुढील हेड लाईटच्या पॅनलवर जय श्रीराम, मागील नंबर प्लेटवर जय बजरंग असे भगव्या रंगात लिहिलेले असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे विजय शामराव पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक बापू रोहोम यांनी सहायक फौजदार रवींद्र गिरासे,सुनील दामोदरे,जयंत चौधरी, विजय शामराव पाटील, सचिन प्रकाश महाजन,भगवान तुकाराम पाटील, महेश आत्माराम महाजन व नंदलाल दशरथ पाटील यांना शेंदुर्णी येथे रवाना केले होते.गणेश हा शेंदुर्णी गावातील नाक्याजवळ मोटार दुचाकीसह मिळून आला. दुचाकीसह त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता ही दुचाकी दीपनगर सरगम गेट, भुसावळ येथून डिसेंबर २०१९ च्या शेवटच्या आठवडयात चोरी केल्याची कबुली दिली. या दुचाकीची नंबर प्लेट बदल केल्याचेही त्याने कबुल केले व ९ दुचाकी त्याने काढून दिल्या.
नऊ दुचाकीसह एकाच्या मुसक्या आवळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 12:24 PM