लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी गुरुवारी होणाऱ्या निवडणुकीत भाजपचे एक तृतीयांश म्हणजेच ५७ पैकी ३८ नगरसेवक आपल्या बाजूने खेचण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. सोमवारपर्यंत शिवसेनेकडे भाजपचे २५ नगरसेवक दाखल झाले होते, तर मंगळवारी प्रा. सचिन पाटील यांच्यासह इतर तीन नगरसेवकदेखील शिवसेनेच्या गोटात दाखल झाल्याने ही संख्या २९ पर्यंत पोहोचली आहे.
महापौर पदासाठी शिवसेनेकडून कोणतीही कमतरता केली जात नसून, एक नगरसेवक वाढविण्याकरिता सेनेची एक टीम सध्या काम करत आहे. लढ्ढा फार्मवरून शिवसेनेची संपूर्ण यंत्रणा सुरू असून, भाजपच्या ५७ पैकी ३८ नगरसेवक फोडण्यासाठी शिवसेनेकडून दिवसरात्र प्रयत्न केले जात असल्याची माहिती शिवसेनेच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
नितीन लढ्ढा, कोल्हे -महाजन सक्रिय
शिवसेनेकडून माजी महापौर नितीन लढ्ढा, ललित कोल्हे व मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन हे तिन्ही सक्रिय असून, भाजपच्या उर्वरित नगरसेवकांशी संपर्क साधून नगरसेवकांना आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
भाजपकडूनही मनधरणीचा प्रयत्न सुरू
एकीकडे शिवसेनेने भाजपच्या उर्वरित नगरसेवकांनादेखील आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू केले असताना दुसरीकडे आमदार सुरेश भोळेदेखील फुटलेल्या नगरसेवकांची मनधरणी करण्याचे प्रयत्न करत आहेत. आमदार सुरेश भोळे दिवसभर अजिंठा विश्रामगृहात ठाण मांडून बसले आहेत. याच ठिकाणावरून भाजपची सर्व सूत्रे हलवली जात आहेत.
जाणाऱ्या नगरसेवकांना रोखण्याचा कोणताही प्रयत्न केला जाणार नाही - गिरीश महाजन
पक्ष सोडून जाणाऱ्यांना रोखण्यासाठी कोणताही प्रयत्न आमच्याकडून केला जाणार नाही. नगरसेवक त्यांच्या मर्जीने गेले आहेत. त्यामुळे यापुढील भूमिका लवकरच निश्चित केली जाईल. महापौर पदाचा उमेदवार बुधवारी अर्ज दाखल करण्याचा वेळेसच जाहीर केला जाणार असल्याची माहिती माजी मंत्री गिरीश महाजन यांनी ‘लोकमत’ला दिली.