लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रेल्वे स्टेशन परिसरातील बिग बजार भागात गावठी कट्टा घेऊन दहशत माजविणाऱ्या युनूस सलीम पटेल ऊर्फ सद्दाम पटेल (वय ३० रा. गेंदालाल मिल) याला गुरुवारी सायंकाळी ५ वाजता शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दहा हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व १५०० रुपये किमतीचे तीन जिवंत काडतूस असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
दरम्यान, युनूस पटेल याने बुधवारी रात्री हळदीच्या कार्यक्रमातही हवेत गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. मात्र यावेळी बंदुकीत गोळी अडकल्याने त्याचा प्रयत्न फसला होता, अशीही माहिती मिळाली आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुुंढे यांनी जळगाव शहरातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना अग्निशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर नजर ठेवून कारवाईचे आदेश दिले. या आदेशानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांनीही गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. बुधवारी रात्री एका ठिकाणी लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात गेंदालाल मिल येथील युनूस सलीम पटेल हा हातात गावठी कट्टा घेऊन नाचला. तेव्हा हवेत फायर करतांना गोळी अडकली होती, अशी गोपनीय माहिती शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील हवालदार अक्रम शेख व भास्कर ठाकरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी संशयित युनूस पटेल याचा शोध सुरू केला.
गुरुवारी दुपारी संशयित बिग बाजार परिसरात हातात गावठी कट्टा घेऊन दहशत माजवित असल्याची माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे, हवालदार अक्रम शेख, भास्कर ठाकरे, विजय निकुंभ, उमेश भांडारकर, गणेश पाटील, किशोर निकुंभ, रतन गीते, प्रणेश ठाकूर या कर्मचाऱ्यांनी बिग बाजार परिसरात सापळा रचून दहशत माजविणाऱ्या संशयित युनूस पटेल यास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता गावठी कट्ट्यासह तीन जिवंत काडतूस त्याच्याकडे मिळाली. याप्रकरणी पोलीस नाईक भास्कर ठाकरे यांच्या फिर्यादीवरुन संशयित युनूस पटेल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास विजय निकुंभ व रतन गीते हे करीत आहेत.