गृहिणींना चिंता : रोजगार कमी होत असताना किराणाचा वाढता खर्च
जळगाव : इंधनाचे वाढते दर वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत असतानाच याचा परिणाम किराणा साहित्यावर देखील होत आहे. वर्षभराची आकडेवारी पाहिली तर डिझेल साधारण तीस टक्क्यांनी महाग झाले आहे तर किराणा साहित्य दीडपटीने वधारला आहे. एकीकडे कोरोनामुळे रोजगार कमी होत असताना किराणाचा खर्च वाढत असल्याने सर्वसामान्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या भाववाढीने गृहिणींचे बजेट चांगलेच कोलमडले आहे.
गेल्यावर्षी कोरोनाचा संसर्ग उद्भवला व त्याचा परिणाम सर्व क्षेत्रावर अजूनही जाणवत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले तर अनेकांच्या पगारामध्ये कपात झाली. आता यंदादेखील निर्बंध काळात विविध व्यवसाय बंद असल्याने सर्वसामान्यांसमोर आर्थिक संकट उभे आहे.
यात भरीसभर म्हणजे गेल्या काही वर्षांपासून डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. डिझेलचे भाव वाढल्यास त्याचा मोठा परिणाम सर्वच क्षेत्रावर जाणवतो. डिझेल भाववाढीने महागाई दिवसेंदिवस वाढतच असून किराणा साहित्यदेखील आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे.
जानेवारी २०२० ते मे २०२१ या काळातील डिझेलची दरवाढ पाहिली तर सर्वांना चक्रावणारी आहे. जानेवारी २०२० मध्ये साधारण ७३ रुपये प्रति लिटर असलेल्या डिझेलचे भाव आता ९० रुपयांच्या पुढे गेले आहेत. यामुळे साहजिकच वाहतुकीचाही खर्च वाढत असल्याने व्यापाऱ्यांना सर्वच मालाच्या वाहतुकीसाठी वाहतूकदारांना वाढीव भाडे द्यावे लागत आहे. परिणामी त्या वस्तूंचे भाव वाढत आहे.
किराणा साहित्यामध्ये वर्षभरात बहुतांश वस्तूंचे भाव जवळपास दीडपट झाले आहे तर काही वस्तूंचे भाव तर थेट दुप्पट झाले आहे. यामुळे वैद्यकीय खर्च एकीकडे वाढत असताना महागाईदेखील वाढत असल्याने जगायचे कसे असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर उभा राहिला आहे.
किराणा दर प्रति किलो
वस्तू-मार्च २०२०-सप्टेंबर २०२०- मे २०२१
तूरडाळ -८५-९०- १२०
हरभरा डाळ -६०-६४-८५
तांदूळ -२२ ते ८५-२६ ते ९५-२८ ते १००
साखर -३६-३६-३६
गूळ -५५-७०-८०
बेसन-७०-८०-९५
तेलही वधारले
प्रकार-मार्च २०२०-सप्टेंबर २०२०- मे २०२१
शेंगदाणा तेल -१३०-१४०-१८०
सूर्यफूल तेल ११०-१३०-१६०
तीळ तेल -२००-२४०-२८०
सोयाबीन तेल -८५-११०-१६०
पाम तेल -८४-९८-१३०
डिझेल दर भाव प्रति लिटर
जानेवारी २०२०- ७२.८६
जून २०२०-७७.८०
जानेवारी २०२१-८०.५१
मे २०२१- ९०.२०
गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे दैनंदिन आवकवर परिणाम झाला असून दुसरीकडे महागाई वाढत आहे. किराणा साहित्यामध्ये तेलाचे दर तर चांगलेच डोकेदुखी ठरत आहे. इतर वस्तूंचेदेखील भाव वाढत असल्याने दिवसेंदिवस चिंताही वाढत आहे.
- शारदा चौधरी, गृहिणी
कोरोनाच्या संकटात वैद्यकीय खर्च वाढला असताना व रोजगाराचे प्रश्न निर्माण झालेले असताना महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वच वस्तू आवाक्याबाहेर गेल्याने सामान्यांनी जगायचे तरी कसे? दररोज घरात ताळमेळ जुळविताना चांगलीच कसरत होत आहे.
- विजया राजपूत, गृहिणी
गेल्या वर्षीचा किराणा साहित्य व धान्याच्या भावाचा विचार केला तर यामध्ये साधारण दीडपटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. इंधन दर वाढत असल्याने मालवाहतुकीसाठी वाढीव भाडे मोजावे लागत असल्याने त्याचा परिणाम भाववाढीत होत आहे.
- प्रवीण पगारिया, अध्यक्ष दाणाबाजार असोसिएशन.
इंधन दर वाढले म्हणजे त्याचा सर्वच क्षेत्रावर परिणाम होतो. डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने मालवाहतुकीचे दरदेखील वाढले आहे. कुठूनही साहित्य आणायचे म्हणजे आता अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
- रमेश वाणी, किराणा व्यावसायिक.