जळगाव - नादुरुस्त डंपरवर दुचाकी आदळल्याने यात दुचाकीवरील २३ वर्षीय युवक ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना दि १ मे रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास तालुक्यातील पिंप्री आकराऊत जवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर घडली .
पोलिसांनी दिलेल्या माहीती नुसार , तालुक्यातील पिंप्रीआकराऊत फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर डंपर क्र MH 19 Z - 4983 हा नादुरुस्त डंपर महामार्गावर नादुरुस्त स्थितीत उभा होता . डंपर चालकाने रस्त्याच्या परीस्थीतीचा विचार न करता व कोणतेही दिशादर्शक फलक न लावता रस्त्यावर बेशिस्त पणे वाहन लावलेले होते . १ मे रोजी तालुक्यातील तरोडा येथील विठ्ठल लक्ष्मण झाल्टे व अर्जुन नामदेव पिवटे हे दोघे दुचाकी क्र MH 19 CD 2173 ने मुक्ताईनगर कडे येत असतांना उभ्या नादुरुस्त डंपरवर दुचाकी धडकल्याने विठ्ठल लक्ष्मण झाल्टे वय २३ हा युवक जागीच ठार झाला . तर अर्जुन पिवटे हा जखमी झाल्याची घटना पहाटे १ वाजेच्या सुमारास घडली . याप्रकरणी प्रभाकर पिवटे रा . तरोडा ता.मुक्ताईनगर यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात डंपर चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . विठ्ठल झाल्टे याचे अपघातात मृत्यु झाल्याची वार्ता कळताच तालुक्यातील हरताळा येथील झाल्टे यांचे मरणामुळे प्रशुब्ध होवून तेजस भावराव बाणाईत , विजय अरुण अहीर , राम श्रीकृष्ण जांभूळकर , रविंद्र एकनाथ पाटील व इतर १० ते १२ जणांचा जमाव सर्व रा . हरताळा यांनी मध्यरात्रीच दीड ते दोन वाजेच्या सुमारास घटनास्थळ गाठुन नादुरुस्त डंपरच्या काचा फोडून डंपर पेटवून नुकसान केले . तसेच रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर देखील मोर्चा वळवून वाहनांच्या काचा फोडल्या तसेच मयत झाल्टे याचे प्रेत शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेले असता रुग्णालयाच्या खिडक्यांच्या तोडफोड करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला . याप्रकरणी हवालदार रवि सपकाळे यांच्या फिर्यादीवरुन तेजस बाणाईत ,विजय अहीर , राम जांभूळकर , रविंद्र पाटील व इतर १० ते १२ जणांविरुद्ध दंगलीचा व सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सर्व चारही आरोपींना अटक करण्यात आली असुन तपास सहाय्यक फौजदार माणिक निकम करीत आहे .