लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : प्रत्येकाने शालेय ज्ञान मिळविणे महत्त्वाचे आहेच, मात्र केवळ वर्गात जाऊन बसणे म्हणजे शिक्षण घेणे होत नाही. शाळेत जाऊनही अनेक जण ‘अशिक्षित’च असतात. लेखी असो की मौखिक असो, जो जीवनाचे चित्र व्यवस्थित मांडू शकला तो खरा शिक्षित आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी शिक्षण घेतलेले नसले तरी त्यांनी जीवनाचे खरे सार आपल्या काव्यातून मांडले. त्यामुळे त्या खऱ्या अर्थाने शिक्षित म्हणाव्या, असे परखड मत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी जळगावात व्यक्त केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला डॉ. भालचंद्र नेमाडे यांची जैन इरिगेशनमधील सहकारी ज्ञानेश्वर शेंडे यांनी मुलाखत घेतली. त्या वेळी डॉ. नेमाडे यांनी विविध विषयांवर मत व्यक्त केले.
बहिणाबाईंच्या कवितांनी अनेकांना धडा
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे जीवनाविषयीचे परिपूर्ण आकलन होते. आजही महिलांना पुरुषांपेक्षा अधिक आकलन असते. त्यामुळे त्या देश व्यवस्थित चालवू शकत आहेत. १९५२ मध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कविता आल्या त्या वेळी इतर कवींना त्यातून धडा मिळाला, असेही डॉ. नेमाडे यांनी नमूद केले.
बोलीभाषांना वाईट दिवस
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे काव्य ज्या बोलीभाषेत आहे, ते सर्वांना भावते. मुळात प्रत्येक बोलीभाषाच ही मूळ भाषा आहे. मात्र जे लिहिले जाते ती प्रमाणभाषा होते. अशाच प्रकारे राज्यात ३२ बोलीभाषा बोलणाऱ्या सर्वांनी प्रमाणभाषा स्वीकारली, हे त्यांचे मोठेपण आहे. मात्र नंतर ती प्रमाणभाषाच खरी वाटू लागल्याने आज बोलीभाषेला वाईट दिवस आल्याचे स्पष्ट मत डॉ. नेमाडे यांनी व्यक्त केले.