लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अवकाळी पावसामुळे गेल्या आठवड्यात वधारलेल्या भाजीपाल्यासह कांदे, बटाट्याचे भाव कमी झाले असून किराणा साहित्याचे दर स्थिर आहेत. त्यामुळे हा आठवडा सर्वांसाठी दिलासादायक ठरला. विशेष म्हणजे, मागणी कायम असताना भाव कमी झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या किराणा साहित्यासह भाजीपाल्याच्या भावात गेल्या आठवड्यात चांगलीच वाढ झाली होती. कोथिंबीर, हिरवी मिरची, लिंबू, कांदे यांचे भाव वाढण्यासह किराणा साहित्यात शेंगदाणे, तूप, मूग डाळ यांचेही भाव वधारले होते तर साखर स्वस्त झाली होती.
गेल्या आठवड्यात ११५ ते १२० रुपये प्रतिकिलोवर असलेले शेंगदणे या आठवड्यातही त्याच भावावर कायम आहेत. अशाच प्रकारे बेसणपीठदेखील ८५ ते ९० रुपये प्रतिकिलो, रवा ३५ ते ४० रुपये, मैदा ३५ ते ४० रुपये प्रतिकिलोवर स्थिर आहे. गेल्या आठवड्यात वनस्पती तुपाच्याही भावात वाढ होऊन ते ११० रुपयांवरून १२० ते १२५ रुपयांवर पोहोचले होते. तेदेखील कायम आहेत.
हिरवी मिरची, मेथी आवाक्यात
अनेक दिवसांपासून बटाट्याचे भाव चांगलेच वाढले होते. मात्र, नवीन बटाट्याची आवक वाढली असल्याने बटाटे २५ रुपये प्रतिकिलोवर आले आहे. यासोबतच हिरवी मिरची ३० ते ४० रुपये तर मेथीची भाजीही ३० ते ४० रुपये प्रतिकिलोवर आली आहे.
कोथिंबीरचे दर नियंत्रणात
गेल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे ५० रुपये प्रतिकिलोवर कोथिंबीरचे दर पोहोचले होते. आता ते कमी होऊन ३० रुपये प्रतिकिलोवर आले आहेत.
साखरेचा गोडवा
गेल्या आठवड्यात कांद्याचे भाव पुन्हा वधारले होते. मात्र, या आठवड्यात ते कमी झाले आहेत. ५० रुपयांवरून कांद्याचे भाव ३० ते ३५ रुपये प्रतिकिलोवर आले आहेत. मध्यंतरी कांद्याने सर्वांच्याच डोळ्यात चांगलेत पाणी आणले होते. आता सर्वांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या आठवड्यात भाजीपाला व किराणा साहित्याचे दर वाढल्याने चांगलाच बोझा वाढला होता. आता भाजापील्याचे दर कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे.
- दिलीप पाटील, ग्राहक
गेल्या आठवड्यात भाववाढ झालेल्या किराणा साहित्याचे भाव
या आठवड्यात स्थिर आहेत. विशेष म्हणजे, मागणी कायम असली तरी भाववाढ झालेली नाही.
- संजय वाणी, व्यापारी
अवकाळी पावसामुळे गेल्या आठवड्यात भाववाढ झालेल्या भाजीपाल्याचे भाव या आठवड्यात कमी झाले आहेत. कोथिंबीर, टोमॅटो, कांद्याचे भाव नियंत्रणात आले आहेत.
- रवी चौधरी, भाजीपाला विक्रेते