लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बदलत्या काळाची पावले ओळखून एसटी महामंडळानेही लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणाऱ्या बसेसला ऑनलाइन बुकिंगची सुविधा केली आहे. मात्र,या ऑनलाइन सुविधेची महामंडळाकडून पुरेशी जनजागृती होत नसल्यामुळे, दहा वर्षांपासून ऑनलाइनची सुविधा सुरू होऊनही अनेक प्रवाशांना एसटीच्या ऑनलाइन तिकीट बुकिंगबद्दल माहिती नसल्याचे महामंडळाने दिलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे. तर सण-उत्सवाच्या काळातच ऑनलाइन बुकिंग करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे जळगाव आगारातर्फे सांगण्यात आले.
दिवसेंदिवस वाढत्या खाजगी वाहतुकीच्या स्पर्धेत टिकण्यासाठी महामंडळाने २०११ पासून एसटी बसचेदेखील ऑनलाइन बुकिंग सुरू केले आहे. महामंडळाच्या वेबसाइटवर किंवा महामंडळाने विकसित केलेल्या मोबाइल ॲपवर प्रवाशांना हे तिकीट बुकिंग करता येत आहे. जळगाव आगारातर्फे सध्या पुणे, मुंबई, सुरत, नाशिक, सोलापूर या मार्गावर जाणाऱ्या बसेसला ऑनलाइन बुकिंगची सुविधा सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांना पंधरा दिवस आधी तिकीट बुकिंग करता येत आहे. जळगाव आगारातही यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. मात्र, प्रवाशांकडून ऑनलाइन बुकिंगला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसून, अनेक प्रवासी बसमध्ये बसल्यावरच तिकीट काढत आहेत. तर दसरा-दिवाळीच्या वेळेस रेल्वेगाड्यांना आरक्षण मिळत नसल्यामुळे आणि दुसरीकडे खाजगी ट्रॅव्हल्सचे तिकीटदर दुपटीने वाढले असल्यामुळे, काही प्रवासी या सण-उत्सवाच्या काळात पर्यायी साधन म्हणून एसटीच्या बुकिंगला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे या काळात ऑनलाइन तिकीट बुकिंग करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
असे करावे ऑनलाइन बुकिंग
एसटी महामंडळाच्या साधी लाल बस किंवा शिवशाही बसचे ऑनलाइन तिकीट बुकिंग करण्यासाठी प्रवाशांना एसटी महामंडळाच्या वेबसाइटवर किंवा रेड बस नावाच्या ॲपवरही ऑनलाइन तिकीट बुकिंग करता येते. वेबसाइट किंवा ॲपवरून तिकीट बुकिंग करताना प्रवाशांना आगाराचे नाव, कुठून कुठे जायचे, बसमधील संख्या आदी माहिती दाखविली जाते. त्यानंतर संबंधित प्रवाशांनी संबंधित ठिकाणी जाऊन तिकीट बुकिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच तिकीट आरक्षण झाल्यानंतर ऑनलाइनद्वारे संबंधित प्रवाशांना महामंडळाकडे तिकिटाचे पैसे वर्ग करावे लागतात.
इन्फो :
प्रवासी म्हणतात, आम्हाला ठाऊकच नाही
आतापर्यंत एसटी बसचे तिकीट कधी ऑनलाइन काढलेले नाही. महामंडळातर्फे ऑनलाइन तिकीट काढण्याची सुविधा असेल, तर ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र, हे तिकीट ऑनलाइन कशा पद्धतीने काढले जाते, यासाठी काय करावे लागते, याची माहिती महामंडळाकडून होणे गरजेचे आहे. तरच प्रवासी या सुविधेचा लाभ घेतील.
काशिनाथ पाटील, प्रवासी
एसटीच्या ऑनलाइन तिकिटाबद्दल फारसे माहीत नाही. तसेच एसटीचेही तिकीट ऑनलाइन बुकिंग करता येते, अशा माहितीचा फलक स्थानकावर दिसून आला नाही. एसटी प्रशासनाने ऑनलाइनची सुविधा कशी आहे, कशा प्रकारे तिकीट काढले जाते, पैसे कसे भरावे लागतात, याची माहिती प्रवाशांना देणे गरजेचे आहे.
विनोद शिंदे, प्रवासी
इन्फो :
बसस्थानकप्रमुखाचा कोट
पुणे, मुंबई मार्गावर चालणाऱ्या गाड्यांना ऑनलाइन बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांना ऑनलाइन बुकिंग माहिती होण्यासाठी महामंडळातर्फे जनजागृतीही करण्यात येत आहे. जळगाव आगारात तिकीट ऑनलाइन बुकिंगसाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
नीलेश पाटील, व्यवस्थापक, जळगाव आगार
इन्फो :
दहा वर्षांत झालेले ऑनलाइन बुकिंग