जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सूचनेनुसार ओंकारेश्वर मंदिर प्रशासनातर्फे महाशिवरात्रीनिमित्त भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार नसून, घरबसल्या भाविकांना ऑनलाईन दर्शनाची सुविधा व मंदिरावरही एल. ई. डी. स्क्रीन उभारून दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती श्री ओंकारेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टतर्फे देण्यात आली आहे. तसेच महाशिवरात्रीनिमित्त या दिवशी श्री ओंकारेश्वर मंदिरात २४ तासात ७ विशेष पर्वामध्ये शिव अभिषेक पूजनाचा कार्यक्रम होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
जळगावकरांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री ओंकारेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. या दिवशी मंदिर प्रशासनातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन व यात्रोत्सव भरविण्यात येत असतो. मात्र, यंदा कोरोनामुळे सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध असल्यामुळे, मंदिर प्रशासनातर्फे फक्त अभिषेक व पूजेसाठी मंदिर उघडे ठेवण्यात येणार आहे. महाशिवरात्रीला कुठल्याही भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार नसून, ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
इन्फो :
२४ तास सुरू राहणार अभिषेक
मंदिर प्रशासनातर्फे महाशिवरात्रीनिमित्त ११ रोजी पहाटे ४ वाजता मंदिर उघडण्यात येणार आहे. संपूर्ण दिवस-रात्र २४ तासांत ७ विशेष पर्वामध्ये शिव अभिषेक पूजनाचा विशेष कार्यक्रम होणार आहे. यामध्ये प्रथम पर्व पहाटे ५ ते ७, दुसरे पर्व सकाळी १० ते दुपारी १२, तिसरे पर्व दुपारी ४ ते सायंकाळी ६, तसेच रात्रीचे प्रथम पर्व सायंकाळी ७ ते रात्री ९, दुसरे पर्व १० ते १२, तिसरे पर्व रात्री १ ते ३, व चौथे पर्व पहाटे ४ ते ६ या वेळात होणार आहे. अभिषेक पूजनानंतर विशेष महाआरतीचा कार्यक्रम होणार असून, दुपारी १२ वाजता अभिजित मुहूर्ताला व सायंकाळी गोरज मुहूर्ताला ६ वाजता विशेष महाआरतीचा कार्यक्रम होणार असल्याचे ट्रस्टचे व्यवस्थापक दीपक जोशी यांनी कळविले आहे.