जळगाव : सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी, अनेक नागरिक खबरदारी म्हणून घराबाहेर जाणे टाळून, ऑनलाईन व्यवहार करण्यावर भर देत आहेत. याचा परिणाम आता महावितरणच्या ऑनलाईन विजबिल भरण्यावरही झाला असून, जून महिन्यात खान्देशातील ३ लाख ग्राहकांनी ऑनलाईन विजबिलाचा भरणा केला आहे. यातील सर्वाधिक एक लाख ८५ हजार ७७२ ग्राहक हे जळगाव जिल्ह्यातील आहेत.
ऑनलाईन विजबिल भरण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटसह मोबाईल ॲप, नेट बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड, मोबाईल वॉलेट व कॅश कार्ड्सचाही पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे गेल्या जून महिन्यात या सर्व सुविधांचा वापर करून खान्देशातील दोन लाख ९१ हजार ३०२ ग्राहकांनी ऑनलाईन विजबिल भरले आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील एक लाख ८५ हजार ७७२ ग्राहक, धुळे जिल्ह्यातील ७७ हजार ६२६ ग्राहक तर नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार जिल्ह्यातील २७ हजार ९०४ ग्राहकांनी ग्राहकांनी ऑनलाईन विजबिल भरले आहे.
इन्फो :
मोबाईलवर मिळते तात्काळ `पोच` :
ग्राहकांनी ऑनलाईन वीजबिल भरल्यानंतर महावितरणतर्फे तात्काळ ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएसद्वारे बिल भरल्याची `पोच` मिळत आहे. तसेच या ग्राहकांना महावितरणच्या वेबसाईटवर वीजबिल भरल्याची पावतीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच वीजबिलात ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सवलतही देण्यात येत आहे.