लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी तत्काळ समितीकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती वैशाली हिंगे यांनी केले आहे. जात वैधता प्रमाणपत्रासाठी १ ऑगस्टपासून ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच त्यासाठी २९ जुलै रोजी ऑनलाईन मार्गदर्शन केले जाणार आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता कार्यालयीन गर्दी कमी करून अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीने वैधता प्रमाणपत्र मिळावे, याकरीता शासन ऑनलाईन सुविधा १ ऑगस्टला सुरू करीत आहे. मात्र, यावर अर्ज करतांना उमेदवारांना अनेकदा अडचणी येत आहेत. त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता मोफत मार्गदर्शन शिबिर गुरुवारी घेतले जात आहे. यावेळी अर्ज सादर कसे करावे, अर्ज सादर करतांना सोबत कोणते दस्तावेज सादर करावे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाईल.
तरी जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज करणाऱ्या मागासप्रवर्गातील उमेदवारांनी महाविद्यालयातील प्राचार्य, कर्मचारी विद्यार्थी, पालक, इंटरनेट कॅफे व्यावसायिक इत्यादींनी या वेबिनारमध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन अध्यक्ष प्रकाश वायचळ यांनी केले आहे.