जळगाव : वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर खरेदी करून, त्यातून नफा मिळवण्याचे आमिष दाखवून शहरातील खासगी नोकरी करणाऱ्या एका व्यक्तीची तब्बल ३२ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. याप्रकरणी सायबर पोलिसांकडे दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील कांचननगर भागातील रहिवासी मोहन रघुनाथ सपकाळे (वय ४२) हे खासगी नोकरी करतात. त्यांना २७ मार्च २०२४ ते ११ एप्रिलपर्यंत केएसएल ग्रुप या व्हॉटस्अॅप ग्रुपवरील शिक्षक अमोल आठवले व श्वेता शेट्टी यांनी एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले.
त्या अॅपवर नोंदणी करून, विविध कंपन्यांचे शेअर खरेदी करण्याबाबतचे सांगण्यात आले. या अॅपवर मोहन सपकाळे यांना आभासी नफा दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर एकूण ३२ लाख २४ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले.
त्यापैकी केवळ १५ हजार रुपयांचा परतावा केला. मात्र, इतर रक्कम परत केली नाही. त्यामुळे मोहन सपकाळे यांनी सायबर पोलिस ठाण्यात जाऊन, शिक्षक अमोल आठवले व श्वेता शेट्टी या अज्ञातांविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम करत आहेत.
आठवडाभरातील पाचवी घटना...
१) ट्रेडींग व शेअर बाजारातील फायद्याचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत जात आहेत. जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवडाभरातील ही पाचवी घटना आहे.
२) एका शिक्षकाची गेल्या आठवड्यात ३४ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली होती. तर, एका डॉक्टराची तब्बल ४७ लाखांमध्ये फसवणूक केली होती. यासह एका शासकीय नोकराचीही ७ लाखांमध्ये फसवणूक करण्यात आली.
३) ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वाढत असल्या तरी या घटनेतील आरोपी मात्र पोलिसांच्या जाळ्यात सापडत नसल्याचेही चित्र आहे.