पुरस्कार प्रस्तावांसाठी आवाहन
जळगाव : शेती व पुरक क्षेत्रात अति उल्लेखनिय कार्य करणा-या शेतक-यास अथवा संस्थेस महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबंधित विविध पुरस्कार दिले जातात. कृषि पुरस्कारासाठीचा प्रस्ताव ३० जूनपर्यंत सादर करावे, असे आवाहन कृषि विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
मदतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षाचालकांना सानुग्रह मदत शासनाने जाहिर केली आहे. हे अनुदान रिक्षा परवानाधारकांच्या बँक खातेमध्ये ऑनलाईन पध्दतीने जमा होणार असून त्यासाठी परिवहन विभागाने प्रणाली विकसीत केली आहे. रिक्षा परवानाधारकांनी वेबसाईटवरील लिंकवर जावून अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करून लाभ घेण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
पथदिव्यांची मागणी
जळगाव : शहर व परिसरात वाढीव वस्ती दिवसेंदिवस वाढत असली तरी त्या भागात पुरेशा सुविधा उपलब्ध होत नाही. यामुळे रहिवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशाच प्रकारे जिजाऊ नगर भागात वाढीव वस्ती झाली असली तरी व हा भाग महापालिकेच्या हद्दीत येत असला तरी या ठिकाणी अद्याप पथदिवे बसविलेले नाही. यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतो. पथदिवे बसविण्याची मागणी या भागातील रहिवाशांनी केली आहे.
वाहतुकीची कोंडी
जळगाव : शहरातील विविध भागांमध्ये वाहतुकीची कोंडी नित्याची झाली आहे. यास वाढते अतिक्रमण कारणीभूत ठरत असले तरी त्याकडे दुर्लक्ष होत आहे. अशाच प्रकारे गिरणा टाकी परिसर ते रामानंद थांब्यापर्यंत दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत मोठी वाहतुकीची कोंडी होते. उपाययोजना करण्याची मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.