जळगाव : देशभरात मार्च सन २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर नागरिकांना घरीच राहून डॉक्टरांचे उपचार घेता यावे, यासाठी आरोग्य विभागाकडून ‘ई-संजीवनी ओपीडी’च्या माध्यमातून एक पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या ओपीडीत ऑनलाईन पद्धतीने उपचार घेता येत असून, रुग्णांना असलेल्या शंकाचे निरसन व योग्य औषधोपचारदेखील सांगितला जात असतो. या ऑनलाईन ओपीडीत ॲलोपॅथी, युनानी, होमिओपॅथीसह आता आयुर्वेदिक उपचार पद्धतीचाही सल्ला दिला जात आहे.
राज्यात गतवर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीत सरकारप्रणित ‘ई-संजीवनी ऑनलाईन मोफत ओपीडी’ सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसेच आता कोरोनाचाही प्रादुर्भाव कमी झाला असला तरी अनेकजण या सेवेचा लाभ घेत आहेत. या माध्यमातून कोणताही गरजू नागरिक घरीच राहून आपल्या आरोग्याविषयी ‘संजीवनी ओपीडी’ या ॲपद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांसोबत मोफत सल्लामसलत करू शकतो, तज्ज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला मिळवू शकतो. या सेवेमुळे रुग्णांना दिलासा मिळण्यास मदत होत आहे.
कशी कराल नोंदणी?ई संजीवनी ओपीडीकरिता असे करा रजिस्ट्रेशन ई-संजीवनी ओपीडी सेवेचा लाभ घेण्यासाठी रुग्ण esanjeevaniopd.in या संकेतस्थळावर भेट देऊन डॉक्टरांशी संवाद साधू शकतात. सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते दुपारी १ आणि दुपारी १.४५ ते सायंकाळी ५ या वेळेत या सेवेचा लाभ घेता येईल. यामध्ये ‘एसएमएस’द्वारे ई-प्रिस्क्रिप्शनही रुग्णांना प्राप्त होते. ते ई-प्रिस्क्रिप्शन दाखवून रुग्ण नजीकच्या सरकारी रुग्णालयातून औषधे घेऊ शकतात.
५९ तज्ज्ञ डॉक्टर देताहेत सल्लाजिल्हा रुग्णालयाकडून ऑनलॉइन ओपीडीसाठी ५९ तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन केल्यानंतर रुग्णाच्या संबंधित आजाराबाबत त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सल्ला दिला जात असतो. रविवार सोडून आठवडाभर ही ओपीडी सुरू असते.
४ हजार रुग्णांनी घेतला लाभजून २०२० मध्ये जळगाव जिल्ह्यात ही ओपीडी सुरू झाल्यानंतर आतापर्यंत जिल्ह्यातील ४ हजार ५३१ रुग्णांनी याठिकाणी नोंदणी करून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे. कोरोना काळात ही संख्या सर्वाधिक होती.
युनानीसह ॲलोपॅथीचाही मिळतो सल्लाऑनलाईन ओपीडीत ॲलोपॅथी, युनानी, होमिओपॅथीसह आयुर्वेदिक उपचार पद्धतीचाही सल्ला दिला जात आहे. उपचार घेणाऱ्यांमध्ये युवकांची संख्या अधिक असते. तांत्रिक ज्ञान असल्याने सहजरीत्या नोंदणी करून, याठिकाणी आरोग्याविषयी लहानात-लहान सल्लादेखील घेतला जात आहे.
जिल्ह्यात ‘ई-संजीवनी ओपीडी’च्या माध्यमातून एक चांगला पर्याय शासनाने उपलब्ध करून दिला आहे. तसेच जिल्ह्यात या ऑनलाईन ओपीडीला चांगला प्रतिसाददेखील मिळत आहे. आतापर्यंत ४ हजारहून अधिक रुग्णांनी या ऑनलाईन संकेतस्थळावरून उपचार घेतले आहेत. तसेच ज्यांना काही अडचणी असतील त्यांनीदेखील याबाबत जिल्हा रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधावा.- डॉ.किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक