लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव जिल्ह्यामध्ये नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. कोरोनाचा संसर्ग अजूनही कायम असल्यामुळे शाळांना ऑनलाइन शिक्षण देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. मात्र, बालभारतीकडून अद्याप नवीन पुस्तक न मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुस्तकांशिवाय ऑनलाइन शाळांमध्ये हजेरी लावावी लागत आहे. गेल्या वर्षीची तीस ते चाळीस टक्के पुस्तके परत आली आहेत. त्यामुळे अभ्यास करायचा तरी कसा, असा प्रश्न ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकला आहे.
इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीद्वारे दरवर्षी मोफत पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. या वर्षी नवीन पुस्तकांची छपाई कोरोना संसर्गामुळे थांबली होती. त्यामुळे पुढच्या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांची पुस्तके शाळांमध्ये जमा करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. मात्र, याकडे बहुतांश पालकांसह विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. केवळ तीस ते चाळीस टक्के विद्यार्थ्यांकडून पुस्तके परत करण्यात आली. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुस्तकांची छपाईदेखील उशिराने झाली. विद्यार्थ्यांना नवीन पुस्तकांची उत्सुकता असते, पण शाळा सुरू होऊन महिना उलटला, अद्याप नवीन पुस्तके विद्यार्थ्यांना मिळालेली नाहीत. त्यामुळे ऑनलाइन शाळेत पुस्तकांशिवाय विद्यार्थ्यांना हजेरी लावावी लागत आहे.
०००००००००००
लवकरच मिळणार पुस्तके
- बहुतांश विद्यार्थ्यांनी शाळांना पुस्तके परत केली आहेत. ही पुस्तके नवीन विद्यार्थ्यांना देण्यात आली आहेत.
- शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा अभियान विभागामार्फत ४ लाख २२ हजार ४०३ विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची मागणी बालभारतीकडे करण्यात आली आहे.
- आठ ते दहा दिवसांत जिल्हास्तरावर पहिली ते आठवीची नवीन पुस्तके प्राप्त होणार आहेत.
- शाळांनी व्हॉट्सॲपवर पाठविलेलाच अभ्यास विद्यार्थी करीत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर पुस्तके मिळावेत, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
०००००००००००
कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण मिळत आहे. अद्याप नवीन पुस्तके मिळालेली नाहीत. पुढच्या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी जी पुस्तके जमा केली होती. ती पुस्तके शाळेकडून देण्यात आली आहेत. त्यावरून अभ्यास सुरू आहे.
- योशिता भालेराव, विद्यार्थिनी, प्रगती विद्यालय
--------
शाळेत जी पुस्तके गोळा करण्यात आली होती, ती पुस्तके अभ्यासासाठी देण्यात आली आहेत. रोटरी क्लबकडूनसुद्धा स्वाध्याय पुस्तिका मिळाली आहे. त्यावरून नियमित अभ्यास सुरू आहे. प्रत्यक्ष शाळा उघडण्याची आता प्रतीक्षा आहे.
- निखिल जाधव, विद्यार्थी, जळके तांडा
००००००००००००
वर्गनिहाय लाभार्थी विद्यार्थीसंख्या
पहिली - ४८१७५
दुसरी -५०१५०
तिसरी - ४९८५३
चौथी - ५३१०५
पाचवी - ५२४२९
सहावी - ५४३५७
सातवी - ५८२३२
आठवी - ५६१०२
०००००००००००००००
लवकरच नवीन पुस्तके शिक्षण विभागाला प्राप्त होणार आहेत. प्रत्येक लाभार्थी विद्यार्थ्यापर्यंत नवीन पुस्तके कशी पोहोचतील, याबाबत नियोजन केले जाणार आहे.
- बी.एस. अकलाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी