जळगाव : ऑनलाइन व्यवहारांच्या वाढत्या ट्रेंडसोबतच ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होते आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अशा ऑनलाईन फसवणूकीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. अशाच प्रकारची आणखी एक घटना समोर आली असून आधी यु-ट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगून नंतर ज्यादा परतावा देण्याचे आमिष दाखवत टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली भोईटेनगरातील मनोजकुमार सुनहरिलाल राज (४५) या रेल्वे कर्मचाऱ्याची २ लाख ९४ हजार ५०० रूपयात फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
यू-ट्यूब चॅनल सबस्क्राइब केल्यानंतर प्रत्येक सबस्क्राईबला ५० रूपये मिळतील, असा एसएमएस सोमवार, दि. ८ मे रोजी मनोजकुमार यांना त्यांच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून आला होता. त्या एसएमएसखाली एक लिंक दिली होती. मनोजकुमार यांनी ती लिंक ओपन करून चॅनल सबस्काइब केले. त्यानंतर त्यांना टेलीग्राम आयडी आणि व्हेरीफिकेशन कोड पाठविण्यात आला. त्यांनी टेलीग्रामवर आयडीवर संपर्क केल्यावर बँक खात्याची माहिती विचारण्यात आली. ती माहिती त्यांनी दिल्यावर त्यांच्या खात्यावर दीडशे रूपयांची रक्कम आली. ८ ते ११ मे या कालावधीमध्ये केलेल्या सबस्क्राईबचे त्यांच्या खात्यावर ४ हजार ३५० रूपयांची रक्कम आली. दरम्यान, ९ मे रोजी त्यांना प्रीपेड प्रमोशन केले तर ४० टक्के फायदा होईल असे सांगून बीटकॉइन खरेदी करण्यास सांगितले. त्यानंतर टास्क पूर्ण करण्यासाठी मनोजकुमार यांच्याकडून सायबर ठगांनी वेळोवेळी एकूण २ लाख ९४ हजार ५०० रूपये युपीआय आयडीवर भरण्यास सांगितले.
मात्र, तरीही त्यांना टास्क पूर्ण झाला नाही, असे सांगण्यात आल्यावर मनोजकुमार यांनी माझे संपूर्ण पैसे परत करावे, असा मेसेज केला. त्यावेळी त्यांना ४ लाख भरले तर संपूर्ण रक्कम मिळेल असे सांगण्यात आले. मनोजकुमार यांना आपली फसवणूक होत असल्याचा संशय बळावला. नंतर त्यांना २ लाख रूपये भरून तुमचे अकाउंट सेटल करा, असा मेसेज आल्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याची खात्री झाली. अखेर मंगळवारी त्यांनी शहर पोलिस ठाण्यात येवून पोलिसांना संपूर्ण हकीकत सांगितली. त्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून सायबर ठगांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड हे करीत आहेत.