लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील शिवाजीनगर भागात होत असलेल्या रेल्वे उड्डाणपुला संदर्भातील वाद शांत होतांना दिसून येत नाही. आधी टी आकाराला विरोध असलेल्या शिवाजीनगर भागातील नागरिकांनी आता पुन्हा याच आकाराच्या पुलासाठी मागणी लावून धरली असून नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी या मागणीसाठी चक्क ऑनलाईन मतदान प्रक्रिया राबवली आहे. या प्रक्रियेदरम्यान नागरिकांकडून ऑनलाईन पद्धतीने अभिप्राय मागवले जात आहेत.
शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र अजूनही या पुलाचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यात आराखड्यानुसार हा पूल टी आकारानुसार मंजूर झाला होता. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्यक्षात पुलाचे काम सुरू करताना एल आकारात केले आहे. त्यामुळे हे काम आराखड्यानुसार तेच केले जावे अशी मागणी भाजपचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी केली आहे. तर याच भागातील काही नागरिकांचा टी आकाराला विरोध कायम आहे. पुलाच्या एल व टी आकारा वरून शिवाजीनगर मधील नागरिकांमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. त्यात आता नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी ऑनलाइन पद्धतीने टी आकाराच्या पुलाच्या मागणीसाठी नागरिकांकडून ऑनलाईन पद्धतीने अभिप्राय मागविले जात आहेत. आठवडाभरापासून हा अभिप्राय मागवला जात असून, पुढील दोन दिवस यासाठी मुदत निर्धारित करण्यात आली आहे. नागरिकांचा टी आकाराचा पुलाला पाठिंबा असल्यास, प्रशासनाला त्याच आकारात पुल तयार करण्यासाठी मंजूर करू असा दावा नवनाथ दारकुंडे यांनी केला आहे.
प्रशासनाकडून अद्यापही निर्णय नाहीच
शिवाजीनगर उड्डाणपुलाचा कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाची भूमिका अद्यापही स्पष्ट होताना दिसून येत नाही. सुरुवातीला शिवाजीनगर भागातील नागरिकांचा टी आकाराचा पूलाला विरोध असताना हा विरोध झुगारून टी आकारातच पूल तयार करण्याचा आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर केला. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीदेखील नागरिकांचा विरोध असताना देखील असतानाही त्यांनीही टी आकार आलाच मंजुरी दिली होती. मात्र प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर पूर्वीप्रमाणेच एल आकारातच या पुलाचे काम सुरू झाल्यामुळे पुन्हा वाद निर्माण झाला आहे. त्यात शिवाजी नगरातील नागरिकांमध्ये देखील दोन गट निर्माण झाले आहेत. आता या ऑनलाइन मतदान प्रक्रियेनंतर शिवाजी नगरातील नगरसेवकांची व नागरिकांची नेमकी भूमिका काय राहील हे स्पष्ट होणार आहे.