आज राज्यस्तरीय ऑनलाइन कविसंमेलन
जळगाव : सत्यशोधक साहित्य परिषदेतर्फे महात्मा जोतीराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त राज्यस्तरीय ऑनलाइन कविसंमेलनाचे आयोजन १३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. उद्घाटन माजी कायदा मंत्री रमाकांत खलप यांच्या हस्ते होणार असून, कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी राज्य शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य केशव देशमुख हे राहणार आहेत. कविसंमेलनात अनेक मान्यवर सहभागी होणार असून कवी डॉ. मिलिंद बागुल हे सूत्रसंचालन करणार आहेत. ऑनलाइन उपस्थिती द्यावी, असे आवाहन डी. एम. अडकमोल, विजयकुमार मौर्य, बापूराव पानपाटील, शिरीष चौधरी, अनिल सुरडकर, सुनील सोनवणे, भैय्यासाहेब देवरे, विजय गवले, विजय लुले, शिवराम शिरसाट यांनी केले आहे.
कलाकारांसाठीच्या मासिक मानधन योजनेसाठी अर्जाबाबत आवाहन
जळगाव : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून वृद्ध साहित्यिक व कलाकारांना मासिक मानधन देण्याच्या योजनेसाठी जिल्हा निवड समितीमार्फत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर कलाकारांनी अर्ज करावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.
खरेदीसाठी गर्दी
जळगाव : मराठी नववर्षातील पहिला सण असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त सोमवारी संध्याकाळी बाजारपेठेत विविध वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी झाली होती. यामध्ये हार, कंगन, किराणा साहित्य, श्रीखंड यांची खरेदी करण्यात आली. यामुळे गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत लगबग दिसून आली.
शासकीय कार्यालय सुनेसुने
जळगाव : संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विविध शासकीय कार्यालयांमध्ये अभ्यागतांना प्रवेश नाकारण्यात आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर कार्यालयांमध्ये वर्दळ कमी झाली आहे. त्यामुळे ही कार्यालये सुनेसुने असल्याचे आठवड्याच्या पहिल्या दिवशी दिसून आले.