जळगाव : ग्राहकांना छापील वीज बिलाऐवजी महावितरणतर्फे गो-ग्रीन योजनेच्या माध्यमातून ई-मेल व एसएमएसद्वारे वीज बिल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ग्राहकांचे एका वीज बिलामागे दहा रुपयांची बचत आहे. वर्षाला १२० रुपयांची बचत होणार आहे. असे असतानांही या योजनेकडे ग्राहकांनी सपशेल पाठ फिरविली आहे. खान्देशातील एकूण साडेसोळा लाख ग्राहकांपैकी फक्त ११ हजार १२३ ग्राहक या योजनेचा लाभ घेत आहेत.
महावितरणतर्फे ग्राहकांना वीज बिलाबाबत विविध प्रकारच्या ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्या तरी आजही ग्राहकांना कागदावरच छापील वीज बिल दिले जाते. यामुळे मोठ्या प्रमाणावर कागद लागत असतो. कागदासाठी लाकूडतोड होऊन, पर्यावरणाची हानी होत असते. त्यामुळे महावितरणने पर्यावरणाच्या रक्षणासाठी गो-ग्रीन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गंत महावितरणकडे नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना छापील वीज बिलाऐवजी दर महिन्याला ई-मेल व एसएमएसद्वारे वीज बिल देण्यात येते. तसेच या आकारलेल्या वीज बिलावर दरमहा १० रुपये सवलत देण्यात येते. विशेष म्हणजे ‘गो-ग्रीन’चा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना तातडीने वीज बिल मिळत असून, संदर्भासाठी वीज बिलाचे जतन करणेही सोपे ठरत आहे.
इन्फो :
ग्राहकांचा अल्प प्रतिसाद
जळगाव, धुळे व नंदुरबार मिळून महावितरणचे सर्व वर्गवारीतील ग्राहक मिळून एकूण १६ लाख ५९ हजार ५१५ वीजग्राहक आहेत. मात्र, यामध्ये फक्त ११ हजार १२३ ग्राहकांनी ‘गो-ग्रीन’ योजनेसाठी नोंदणी केली आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील ७ हजार २६१, धुळे जिल्ह्यातील २ हजार ५५१, तर नंदुरबार जिल्ह्यातील १ हजार ३११ ग्राहकांचा समावेश आहे. दरम्यान, या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना फक्त मोबाईल ॲप किंवा वेबसाईटवर नोंदणी करणे गरजेचे आहे. मात्र, तरीही ग्राहक प्रतिसाद देत नसल्याची स्थिती आहे.