लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला होता. मार्च, एप्रिल हे दोन महिने अगदीच कठीण होते. मात्र, कोरोनाची ही लाट
ओसरत असून, आता तीन ते चार तालुके सोडले, तर उर्वरित भागात ४०० पेक्षाही कमी सक्रिय रुग्ण आहेत. विशेष बाब म्हणजे जिल्ह्यातील
एकूण सक्रिय रुग्णांपैकी केवळ १६ टक्के रुग्ण हे विविध रुग्णालयांत दाखल आहेत. ही संख्या १०४१ आहे. त्या मानाने बेडची संख्या अधिक असल्याने आता अनेक खासगी कोविड रुग्णालये बंद होत आहेत.
मार्च व एप्रिलची तुलना केली असता मे महिन्यात रुग्णालयात दाखल रुग्णांचे प्रमाण १० टक्क्यांनी घटले आहे. यासह होम आयसोलेशनमधील रुग्णांचे प्रमाण ४० टक्क्यांनी घटले आहे. रुग्णालयात कमी रुग्ण असल्याने यंत्रणेवरचा ताण कमी होत आहे. त्या रुग्णांना अधिक गुणवत्तापूर्वक उपचार देणे सोपे होत असून, बेड रिक्त आहेत. या मानसिकतेमुळेही रुग्णांना आधार मिळत आहे. मध्यंतरी बेडच मिळत नव्हते, या माहितीमुळे रुग्णांना अधिक धक्का बसत होता. आता शासकीय, खासगी दोन्ही यंत्रणांमध्ये पुरेसे बेड रिक्त आहेत.
तीन महिन्यातील स्थिती
३० मार्च : सक्रिय रुग्ण : ११६७४, रुग्णालयात दाखल रुग्ण २३.५९ टक्के
३० एप्रिल : सक्रिय रुग्ण : १०६६१, रुग्णालयात दाखल रुग्ण २७.४५ टक्के
३० मे : सक्रिय रुग्ण : ६१९१, रुग्णालयात दाखल रुग्ण १६.८१ टक्के
सक्रिय रुग्ण सर्वांत कमी असलेले पाच तालुके
भडगाव : ५८
धरणगाव : १९४
पारोळा : १९८
अमळनेर : २१४
जळगाव ग्रामीण : २३५
सक्रिय रुग्ण सर्वांत जास्त असलेले पाच तालुके
चाळीसगाव : ८२७
भुसावळ : ६७४
जामनेर : ५९८
जळगाव शहर : ५२७
मुक्ताईनगर : ५१०
यंदा ग्रामीण भागात उद्रेक
पहिल्या लाटेत सर्वाधिक रुग्ण हे जळगाव शहरातच आढळून आले होते. शिवाय लाट ओसरत असतानाही शहरातच सर्वाधिक सक्रिय रुग्ण होते. दुसऱ्या लाटेत मात्र जळगाव शहर वगळता जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा उद्रेक वाढून प्रथमच सक्रिय रुग्णांच्या बाबतीत जळगावचा चौथा क्रमांक आहे. जळगावच्या आधी चाळीसगाव, भुसावळ, जामनेर या भागांत अधिक सक्रिय रुग्ण आहेत. याचा अर्थ कोरोनाचे नियंत्रण हे जळगाव शहरापासून सुरू झाले असून, हळूहळू ग्रामीण भागात वाढलेला कोरोना आता नियंत्रणात येत आहे.
रुग्णालये बंद
कोरोनाची लाट ओसरत असून, रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यातच गंभीर रुग्णांचे प्रमाण, शिवाय लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण कमी असल्याने लोक होम आयसोलेशन किंवा कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होण्यावर भर देत आहेत. थेट रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या अगदीच कमी झाली आहे. त्यामुळे शहरासह जिल्हाभरातील २५ ते ३० कोविड रुग्णालये दुसऱ्या लाटेत बंद झाली आहेत. रोज किमान एक ते दोन रुग्णालयांची कोविड सेवा बंद करण्याबाबतचे पत्र येत असल्याची माहिती आहे.