जळगाव : जिल्ह्यात मान्सून दाखल झाला असला तरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. आतापर्यंत पाहिजे तसा पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील पेरण्या देखील खोळंबल्या असून, २० जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ १८ टक्के पेरण्या झाल्या असल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. अजून पावसाचा खंड राहिला तर दुबार पेरणीचे संकट निर्माण होवू शकते अशी भिती जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षी २० जूनपर्यंत सुमारे ४० टक्के पेरण्या पुर्ण झाल्या होत्या. मात्र, यावर्षी मान्सून वेळेवर दाखल झाल्यावर देखील अनेक भागात पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्या थांबल्या आहेत. १८ टक्के पेरण्या झाल्या असल्या तरी यामध्ये कापसाचे जवळपास ९० टक्के क्षेत्राचा समावेश आहे. हंगामपूर्व कापसाची लागवड वगळली तर जिल्ह्यात एकूण केवळ ५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पुर्ण झाल्या आहेत. उडीद, मूग, सोयाबीन अद्याप पेरणी झाली नसून, आता या पेरण्या जुलै महिन्याचा पहिल्या आठवड्यापर्यंत पुर्ण होण्याची शक्यता आहे.
कापसाची १ लाख १३ हेक्टर क्षेत्रावर लागवड
गेल्यावर्षाच्या तुलनेत कापसाची लागवड यंदा २० जूनपर्यंत कमीच झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे १ लाख ३३ हजार ३६० हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. जिल्ह्यात यंदा ५ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड होण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाकडून ठेवण्यात आले होते. मात्र, पावसाने दडी मारल्याने अद्यापही मान्सूननंतरच्या कापसाची लागवड झालेली नाही.१ लाख ३३ हजार हेक्टरपैकी जवळपास १ लाख २० हजार हेक्टर कापसाची लागवड ही मान्सूनपुर्व आहे. पाऊस लांबल्यास कापसाच्या लागवड क्षेत्रावर देखील यंदा परिणाम होण्याची शक्यता आहे.
सोयाबीन,मूग, उडीदची पेरणीच नाही
जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस व मक्यानंतर सर्वाधिक लागवड ही मूग, उडीद व सोयाबीन य पीकांची होत असते. मात्र, यावर्षी दमदार पाऊस झाला नसल्याने जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंतदेखील या पीकांच्या पेरण्यांना सुरुवात झालेली नाही. सोयाबीनची केवळ १८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर उडीद व मूगची देखील शुन्य टक्के पेरणी आहे. उसाची जवळपास २ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. तर मक्याची २ हजार ६४३ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
अजून आठवडाभर पावसाचा खंड ?
राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी अद्याप कोकण किनारपट्टीलगतच पावसाने दमदार हजेरी लावली असून, जिल्ह्यात अद्याप पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. दरम्यान, अजून आठवडाभर जिल्ह्यात तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काही तालुक्यांमध्ये कमी व जास्त प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
पेरण्यांची तालुकानिहाय स्थिती
तालुका - लागवड क्षेत्र - टक्केवारी
जळगाव - ५ हजार २४२ - ९ टक्के
भुसावळ - ८ हजार ९२५ - ३४ टक्के
बोदवड - १ हजार ३४९ - ४
यावल - ४ हजार २०६ -९
रावेर - १३ हजार ४३५ - ४६
मुक्ताईनगर - ९ हजार ३१६१ - ८
अमळनेर - ५ हजार ३८६ - ८
चोपडा - १० हजार ४२४ - १७
एरंडोल -५ हजार ७५० - १५
धरणगाव - ५ हजार १२० - १२
पारोळा - ६ हजार २०० - १२
चाळीसगाव - २२ हजार ०३७ - २५
जामनेर - १६ हजार ८४० - १७
पाचोरा - १९ हजार २२१ - ३३
भडगाव - ६ हजार ३१ - १८