जळगाव : सोन्याच्या दागिन्यांवर १५ जानेवारीपासून हॉलमार्किंग संपूर्ण देशात लागू झाली असली तरी अद्याप पुरेसी यंत्रणा नसल्याने दागिन्यांबाबत धोका वाढत आहे. सुवर्णनगरी जळगावचाच विचार केला तर येथील १५० सुवर्णपेढ्यांसाठी येथे केवळ दोनच हॉलमार्किंग केंद्र आहे. तालुक्याच्या ठिकाणी हे केंद्र नसल्याने तेथून दागिने जळगावात आणणे धोकेदायक ठरू शकते, असा सूर उमटत आहे.१५ जानेवारीपासून सोन्याचे दागिने खरेदी-विक्रीसाठी बीआयएस ‘हॉलमार्किंग’ आवश्यक राहणार आहे. यामुळे सोन्याच्या शुद्धतेची खात्री राहणार आहे. तसे पाहता सुवर्णनगरीतील सोन्याबाबत विश्वासहार्यता असून त्यात यामुळे आणखी भर पडणार आहे. येथील सोने- चांदीच्या व्यवसायाने भारतात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. दर्जा, शुद्धता, विश्वासार्हता आणि सचोटीचा व्यवहार याला सोन्याच्या व्यवसायात अनन्यसाधारण महत्त्व असते. त्याच विश्वासावर जळगावातील सोने देशभरात प्रसिद्ध असल्याने येथे देशाच्या विविध भागातील ग्राहक सोने खरेदीसाठी येतात. भारताच्या कानाकोपऱ्यातील सांस्कृतिक परंपरा जोपासणारे अथवा आधुनिक पद्धतीचे दागिने पाहिजे असतील तर जळगावला पसंती दिली जाते. याला कारण म्हणजे येथील शुद्धताच आहे.आता या शुद्धतेच्या विश्वासार्हतेवर हॉलमार्किंगने आणखी भर पडणार आहे. आता सोन्याचे दागिने खरेदी-विक्रीसाठी बीआयएस ‘हॉलमार्किंग’ आवश्यक राहणार असून यामुळे सोन्याच्या शुद्धतेची खात्री राहणार आहे.पुरेसी यंत्रणा आवश्यकसरकारने हॉलमार्किंग सक्तीचे केले असले तरी पुरेसी यंत्रणा आवश्यक आहे. सुवर्णनगरीत जवळपास दीडशेच्यावर सुवर्ण पेढ्या आहेत. एवढ्या विक्रेत्यांसाठी येथे केवळ दोनच हॉलमार्किंग केंद्र असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले. त्यामुळे हे केंद्र पुरेसे ठरणार नाही. एक तर तालुकास्तरावर हे केंद्र नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्याकडील दागिने हॉलमार्किंगसाठी या केंद्रांवर आणावे लागतील. यात वाहतुकीदरम्यान मोठा धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी सरकारने तालुकास्तरावरही हे केंद्र सुरू करण्याची मागणी आहे.हॉलमार्किंगचे स्वागत आहे. मात्र त्यासाठी पुरेसी यंत्रणा अगोदर उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. सरकारने तालुकास्तरावरही हॉलमार्किंग केंद्र सुरु करावे.- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन.
सुवर्णनगरीत १५० सुवर्णपेढ्यांसाठी केवळ दोन हॉलमार्किंग केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 12:08 PM