अमळनेर : तालुक्यात जून महिन्यात सरासरी ११४ मिमी पावसाची अपेक्षा असताना, फक्त १३.९ मिमी सरासरी पाऊस पडल्याने ६६ हेक्टर क्षेत्रापैकी फक्त १७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. येत्या आठ दिवसात पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे.
दरवर्षी तालुक्यात सुमारे ४८ हजार ७५० हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र यंदा पाऊस समाधानकारक न झाल्याने १० हजार हेक्टर क्षेत्रावर पूर्वहंगामी कापूस तर काही ठिकाणी पाऊस पडल्यामुळे ५ हजार हेक्टर क्षेत्रावर कोरडवाहू कापूस लावण्यात आला तर, १८ हजार क्षेत्रावर मका, ज्वारी, उडीद, मूग, तीळ, बाजरी, भुईमूग, तूर आदी पिके घेतली जातात. मात्र फक्त २ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.
तालुक्यात अमळनेर मंडळात २६.९ मिमी, शिरुड ८.२ मिमी, पातोंडा ७.६ मिमी, मारवड १४.४ मिमी, नगाव ८.८ मिमी, अमळगाव ९.८ मिमी, भरवस १२.६ मिमी, वावडे २५.३ मिमी असा पाऊस पडला आहे. तालुक्यात सरासरी १२ टक्के पाऊस पडला आहे.
हवामान खात्यातर्फे २० जूनपर्यंत कोरडे वातावरण सांगण्यात आले होते.
येत्या आठ दिवसात पाऊस न पडल्यास दुबार पेरणीचे संकट येऊ शकते.
- भारत वारे, तालुका कृषी अधिकारी, अमळनेर