लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहराला वळसा घालून जाणाऱ्या तरसोद ते फागणे या मार्गाचे काम आता ३५ टक्के पूर्ण झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून या कामाला फारसा वेग मिळत नव्हता. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या ठेकेदाराला सुमारे चार कोटींचा दंड ठोठावला. याबाबत जळगावचे खासदार उन्मेश पाटील यांनी लोकसभेतदेखील हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर या कामाला वेग मिळाला आहे.
सध्या जळगाव शहरात दोन्ही ठिकाणी चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यात शहरातून जाणारा ८ किमीचा महामार्ग आणि शहराला वळसा घालून जाणारा नवा महामार्ग आहे. हा नवा महामार्ग चौपदरीकरणात तरसोद ते फागणे आणि तरसोद ते चिखली असे दोन टप्पे आहेत. त्यात तरसोद ते फागणे या मार्गाचे काम कायमच संथगतीने होत असल्याची चर्चा होते.
तरसोद ते फागणे हा टप्पा आहे. हा टप्पा ८७ किमीचा असून त्याची किंमत १०२१ कोटी रुपये आहे. मात्र या कामाला फारसा वेग मिळत नव्हता. या रस्त्यात बहुतांश ठिकाणी खोदकाम करण्यात आले होते.
चार कोटींचा ठोठावला होता दंड
पाळधीपासून पुढे तरसोदपर्यंत या रस्त्यावर वर्दळ नसली तरी पाळधी ते फागणे हा भाग महामार्गाचा आणि कायमच वर्दळीचा होता. मात्र तरीही हे काम संथगतीने सुरू होते. त्यात दरम्यान झालेल्या अपघातांमध्ये सुमारे दीड वर्षाच्या कालावधीत दोनशे जणांचा मृत्यूदेखील झाला. त्यामुळे खासदार उन्मेश पाटील यांनी लोकसभेत हा प्रश्न उपस्थित केला होता. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या मार्गाचा इंदूर येथील ठेकेदाराला चार कोटींचा दंड ठोठावला.
पारोळ्याच्या आसपास काम वेगात
या मार्गात पारोळा ते फागणे या रस्त्यावर चांगले काम झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. तरसोद ते पाळधी या दरम्यानदेखील कामात प्रगती आहे. मात्र भादली आणि असोदा गावाजवळ रेल्वे लाइन ओलांडण्यासाठी अजूनही पूल किंवा गिरणा नदीवर नवीन पुलाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे ही कामे अपूर्ण आहेत. या कामाची मुदत जानेवारी २०२२ पर्यंत आहे. मात्र त्यालादेखील कोरोनामुळे ९० दिवसांची मुदतवाढ मिळू शकते.
आकडेवारी
तरसोद ते फागणे
रस्त्यांचे अंतर ८७.३ किमी
प्रकल्पाची किंमत १०२१ कोटी
काम पूर्ण करण्याची मुदत जानेवारी २०२२
पूर्ण झालेले काम - सुमारे ३५ टक्के