लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल १८ जानेवारीला लागला. त्यानंतर आता विजयी आणि पराभूत अशा सर्व उमेदवारांना निवडणुकीत केलेल्या खर्चाचे विवरणपत्र सादर करावे लागणार आहे. त्यामुळे ते सादर करण्याची लगबग उमेदवारांनी सुरू केली आहे.
जळगाव तालुक्यातील १९९ उमेदवारांनी आतापर्यंत ग्रामपंचायत निवडणुकीत केलेल्या खर्चाचे विवरण सादर केले आहे. जळगाव तालुक्यात ९७५ उमेदवारांनी निवडणुक लढवली. त्यातील फक्त १९९ उमेदवारांनी गुरूवारपर्यंत आपल्या निवडणुक खर्चाचे विवरण पत्र सादर केले होते. राज्य निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार या उमेदवारांना निकाल लागल्यापासून ३० दिवसांच्या आत आपल्या निवडणुक खर्चाचे विवरणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार अनेक उमेदवार निवडणुकीनंतर विवरण पत्र सादर करत आहेत.
तहसील कार्यालयातील कर्मचारी करत आहेत घाई
जळगाव तहसील कार्यालयात प्रवेश केल्यावर डाव्या बाजुला लगेच निवडणुक खर्चाचे विवरण जमा करण्यासाठी आणि त्याची तपासणी करण्यासाठी काऊंटर लावण्यात आले आहे. तेथे चौकशी केली असता तेथील कर्मचारी लवकरात लवकर विवरण सादर करा, असे उमेदवारांना सांगत आहे. त्यामुळेच कदाचित तीन दिवसात २० टक्के उमेदवारांनी विवरण पत्र सादर केले आहे.
आकडेवारी
जळगाव तालुका
उमेदवारांची एकुण संख्या ९७५
खर्चाचे विवरण पत्र भरलेल्या उमेदवारांची संख्या १९९
एकुण सदस्य संख्या ४६३