लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपाच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळे ताब्यात घेऊन त्या गाळ्यांच्या लिलाव करण्याचा ठराव महासभेत मंजूर केल्यानंतर अजूनही गाळेधारकांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. शहरातील १६ अव्यावसायिक मार्केटमधील गाळेधारक गेल्या दीड महिन्यांपासून संपावर आहेत. त्यात आता गाळेधारकांच्या विरोधातील प्रस्ताव महासभेने मंजूर केल्यामुळे गाळेधारकांची आंदोलनाची भूमिका नेमकी कशी राहील याबाबत आता लॉक डाऊन नंतरच गाळेधारक आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गेल्या नऊ वर्षांपासून मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांच्या प्रश्न प्रलंबित होता. यामुळे गाळेधारकांसह मनपाचे देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत होते. अखेर १२ मे रोजी झालेल्या महासभेत बहुमताने मनपा प्रशासनाने सादर केलेला प्रस्ताव मंजूर केल्यामुळे आता थकीत भाडे वसूल करण्यासह गाळे कारवाईची प्रक्रियादेखील महापालिकेला करता येणार आहे. मात्र मनपा प्रशासनाचा प्रस्ताव गाळेधारकांना मान्य नसून याबाबत या प्रस्तावावर पूर्ण अभ्यास केल्यानंतरच गाळेधारक संघटना आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. तोपर्यंत गाळे धारकांचा संप कायम कायम राहणार आहे. दरम्यान महासभेत मंजूर झालेल्या ठरावाबाबत देखील गाळेधारकांचे आक्षेप असून, विरोधी पक्ष असलेल्या भाजप सोबत हा ठराव विखंडित करण्यासाठी आता गाळेधारक व भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत.
जूनच्या पहिल्या आठवड्यापासून गाळेधारकांच्या सुनावणीस होणार सुरुवात ?
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला गाळेधारकांच्या प्रश्नावर महासभेने मंजुरी दिल्यामुळे आता पुढील प्रक्रियेसाठी मनपा प्रशासनाकडून देखील हालचाली सुरू झाल्या आहेत. मनपा प्रशासनाने मनपा अधिनियमातील ७९ क कलम अंतर्गत जे गाळेधारक नूतनीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. त्या गाळेधारकांचे प्रस्ताव मागवले जाणार आहेत. त्यानंतर सुनावणी प्रक्रिया घेऊन गाळेधारक नूतनीकरणासाठी पात्र की अपात्र याबाबतची चाचणी देखील करण्यात येणार आहे. तसेच ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर थकीत भाडे वसूल करून मुदत संपलेले गाळे ताब्यात घेऊन लिलावाची प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. जुलै महिन्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याची तयारी देखील आता मनपा प्रशासनाने केली आहे.