शाहरुखमध्ये मला युवा पोलार्ड दिसतो - सेहवाग भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने म्हटले की, ‘पंजाब किंग्जचा बॅट्समन शाहरुख खान हा मला युवा किएरोन पोलार्ड याची आठवण करून देतो. पोलार्ड जेव्हा आयपीएलमध्ये खेळायला आला होता. तेव्हा तो उभा राहूनच षटकार लगावत होता. शाहरुखमध्येदेखील तेच गुण आहेत. तो शतकदेखील झळकावू शकतो.’
रुटच्या वर्षातील एक हजार धावा पूर्ण
इंग्लंडचा कसोटीपटू आणि यॉर्कशरचा फलंदाज जो रुट याने २०२१ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. या वर्षात अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. त्याने यॉर्कशर-ग्लामॉर्गन काऊंटी चॅम्पियनशिप सामन्यात शनिवारी ९९ धावा करीत ही कामगिरी केली. रुट आणि यॉर्कशरचा कॅप्टन स्टिव्ह पॅट्टरसन यांनी नवव्या गड्यासाठी ११८ धावांची भागीदारी केली. त्यामुळे यॉर्कशर ८१ धावांनी आघाडीवर आहे.
युवा गोलंदाजांना टिप्स देण्यात आनंद - शमी
इंग्लंडला जाण्याच्या आधी भारताचा गोलंदाज मोहम्मद शमी याने म्हटले आहे की, ‘तो संघातील युवा गोलंदाजांना काही टिप्स देऊ इच्छितो. त्याने म्हटले की, मी कायम खेळणार नाही. त्यामुळे माझ्याकडे जे आहे ते युवा गोलंदाजांना देत राहण्यात मला नक्कीच आवडेल.’
इशानीसोबत राहुल गेला सुटीवर
इंडियन प्रीमियर लीग पुढे ढकलली गेल्यानंतर मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू राहुल चहार हा त्याची वाग्दत्त वधू इशानीसोबत गोव्यात गेला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर दोघांचे रोमँटिक फोटोदेखील पोस्ट केले आहेत. दिल्लीचा फलंदाज पृथ्वी शॉ हादेखील गोव्यात गेल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. आता राहुल चहारदेखील गोव्यात गेला आहे.